दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डु-प्लेसिसने आपल्या कसोटी आणि टी-२० कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डाला डु-प्लेसिसने याबद्दलची माहिती दिली आहे. नवोदीत खेळाडूंना योग्य संधी मिळावी यासाठी आपण पायउतार होत असल्याचं डु-प्लेसिसने स्पष्ट केलं. डु-प्लेसिसनंतर यष्टीरक्षक क्विंटन डी-कॉककडे आफ्रिकेच्या संघाचं नेतृत्व जाण्याची शक्यता आहे.

क्विंटन डी-कॉककडे आफ्रिकेचं नेतृत्व

 

इंग्लंडविरुद्ध वन-डे मालिकेसाठी आफ्रिकेच्या संघाचं नेतृत्व डी-कॉककडे सोपवण्यात आलं होतं. याआधीही भारताविरुद्ध टी-२० मालिकेत डी-कॉकने आफ्रिकेचं नेतृत्व केलं होतं. मात्र डु-प्लेसिसच्या राजीनाम्यानंतर आता आफ्रिकेची सुत्र डी-कॉकच्या हाती जाणार हे स्पष्ट झालं आहे.

आफ्रिकेचं नेतृत्व करण्यासाठी मिळालेल्या संधीबद्दल डु-प्लेसिसने बोर्डाचे आभार मानले. “गेले काही दिवस विश्रांतीदरम्यान मला ही गोष्ट नेहमी जाणवत होती की आफ्रिकेच्या संघाचं तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये नेतृत्व करण्याचं भाग्य मला मिळालं. या प्रवासात काही आनंदाचे क्षण आले तर काही खडतर…परंतु माझ्यासाठी खेळाडू म्हणून हा अनुभव नेहमी चांगलाच राहिलेला आहे. आयुष्यभर मला तो पुरेल असा आहे. पायउतार होणं हा सर्वात कठीण निर्णय होता…पण क्विंटनला मदत करण्यासाठी मी नेहमी हजर आहे.”