फलंदाज ते कर्णधार

१९६६ साली भारतीय संघात प्रवेशाची संधी मिळाल्यावर त्यांनी एक शैलीदार आक्रमक फलंदाज म्हणून नावलौकीक प्रस्थापित केला. तिसऱ्या क्रमांकावरील भरवशाचा फलंदाज तसेच स्लीपमधील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून त्यांनी संघातील स्थान भक्कम केले. भारतीय संघाचे कर्णधारपद त्यांच्याकडे १९७१ साली सोपवण्यात आले होते. त्यांना भारत सरकारने १९६७ साली अर्जुन पुरस्कार तर १९७२ साली पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

कर्णधारपदावरील यश

१९७१ साली कर्णधारपद सोपवले गेल्यानंतर इंग्लंडविरुद्ध पहिला मालिकाविजय मिळवून देण्याची कामगिरी त्यांच्या नेतृत्वाखालील संघाने करून दाखवली होती. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत दोन सामने अनिर्णीत राखले तर एक सामना भारताने जिंकून ही मालिका १-० अशी जिंकली होती. त्यानंतर वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने चार कसोटी अनिर्णीत राखले तर एक सामना जिंकून घेत १-० असा मालिकाविजय संपादन केला होता. त्यानंतर पुन्हा १९७२-७३ सालच्या इंग्लंड दौऱ्यात भारताने पुन्हा इंग्लंडला लोळवले. विशेष म्हणजे त्यात भारताने २-१ असा विजय प्राप्त केला होता.

निवृत्तीनंतरचा कालावधी

१९९०च्या दशकात भारतीय क्रिकेटचे व्यवस्थापक म्हणून त्यांनी कामकाज पाहिले. त्यावेळी भारतीय संघाच्या कर्णधारपदी मोहम्मद अझरुद्दीन होता. भारतीय कसोटीपटू, कर्णधार, व्यवस्थापक तसेच राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्षपद अशी अनेक पदे त्यांनी भूषवली आहेत. केवळ लाला अमरनाथ आणि चंदू बोर्डे यांनाच ही मानाची पदे मिळाली होती.

अजित लक्ष्मण वाडेकर

* फलंदाजी : डावखुरे शैलीदार फलंदाज

* गोलंदाजी : डावखुरी मध्यमगती

* भारतीय संघातील कारकीर्द

* कसोटी पदार्पण : १३ डिसेंबर १९६६ वेस्ट इंडिज विरुद्ध

* अखेरची कसोटी :  ४ जुलै १९७४ इंग्लंड विरुद्ध

* एकदिवसीय पदार्पण : १३ जुलै १९७४ इंग्लंड विरुद्ध

* अखेरचा एकदिवसीय सामना : १५ जुलै १९७४ इंग्लंड विरुद्ध

* स्थानिक संघ : बॉम्बे (मुंबई), शिवाजी पार्क जिमखाना

कारकीर्द आकडेवारी

स्पर्धा                        कसोटी       एकदिवसीय

सामने                         ३७             २

धावा                          २११३          ७३

सरासरी                     ३१.०७          ३६.५०

शतके/ अर्धशतके        १/१४         ०/१

सर्वोत्तम कामगिरी       १४३          ६७

अजित वाडेकर यांनी भारतीय क्रिकेटला महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. महान फलंदाज आणि निपुण संघनायक ही त्यांची ओळख होती. त्यांच्या नेतृत्वाखालील भारताने परदेशात संस्मरणीय विजय संपादन केले होते, ज्यांची क्रिकेट इतिहासात नोंद घेतली गेली. निवृत्तीनंतर त्यांनी क्रिकेट प्रशासनातही रस घेतला. त्यामुळेच त्यांच्या निधनामुळे भारतीय क्रिकेटमध्ये पोकळी निर्माण झाली आहे.

नरेंद्र मोदी, पंतप्रधान

भारतीय संघाचे समर्थ नेतृत्व वाडेकर यांनीच करून दाखवले होते. त्यांच्या त्या नेतृत्वामुळेच भारताला  वेस्ट इंडिज आणि इंग्लंडसारख्या दमदार संघांविरुद्ध मालिकाविजय मिळवणे शक्य झाले होते. भारतीय क्रिकेटचे समर्थ नेतृत्व हरपले आहे.

– हर्षां भोगले, समालोचक

सलग तीन मालिकांपैकी दोन मालिका विदेशी भूमीवर तर एक मालिका भारतात जिंकून दाखवण्याची अफलातून कामगिरी वाडेकर यांनी करून दाखवली होती. ही कामगिरी अन्य कुणालाही शक्य झालेली नाही. आमचे काही बाबतीत मतभेद असले तरी एकमेकांबद्दल आदर होता.

– बिशनसिंग बेदी, माजी फिरकीपटू

परदेशी भूमीवरील मालिका विजय संपादनातील सर्वाधिक यशस्वी भारतीय कर्णधाराला गमावणे, हा भारतीय क्रिकेटच्या दृष्टीने अत्यंत मोठा धक्का आहे. सर्व क्रिकेटप्रेमी वाडेकर कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहेत.

– रवी शास्त्री, भारताचे मुख्य प्रशिक्षक