क्रिकेटप्रेमीसांठी रविवारचा दिवस खूपच स्पेशल ठरला. पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका संघांत दुसरा एकदिवसीय सामना खेळवण्यात आला. या सामन्यात आफ्रिकेने पाकिस्तानसमोर 341 धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात पाकिस्तानने कडवी झुंज देत 324 धावा उभारल्या. पाकिस्तानच्या या डावात फखर झमानने 193 धावांची वादळी खेळी केली.

193 धावांवर असताना क्विंटन डी कॉकच्या धूर्तपणामुळे फखर धावबाद झाला. त्यामुळे रंगतदार सामन्यात पाकिस्तानला पराभव स्वीकारावा लागला. या खेळीमुळे फखरने मागील 50 वर्षातील मोठी कामगिरी केली. फखरने आपल्या खेळीत 155 चेंडूत 10 षटकार आणि 18 चौकार लगावले.

फखरचा विक्रम

5 जानेवारी 1971 रोजी खेळल्या गेलेल्या पहिल्या वनडे सामन्यानंतर धावसंख्येचा पाठलाग करताना सर्वाधिक धावा करणारा फखर जमान हा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. फखरच्या अगोदर 2011मध्ये शेन वॉटसनने बांगलादेशविरूद्ध नाबाद 185, 2005मध्ये बांगलादेशविरूद्ध महेंद्रसिंह धोनीने नाबाद 183 आणि 2012मध्ये विराट कोहलीने पाकिस्तानविरुद्ध 183 धावांची खेळी केली होती.

 

दुर्दैवाने 49व्या षटकातील पहिल्या चेंडूवर फखर धावबाद झाला आणि पाकिस्तानने हा सामना 17 धावांनी गमावला. नाणेफेक गमावलेल्या दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 6 गडी गमावत 341 धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ 9 गडी गमावत 234 धावा करू शकला. पाकिस्तानने सामना गमावला असला तरी सामनावीर पुरस्कार मिळालेल्या फखरचे नाव अजून मोठे झाले आहे.