28 February 2020

News Flash

सामान्य चाहते घटले..

खासगी जिमखाने, क्लब्स आणि सधन वर्गापुरती मर्यादित अशी टेनिसची ओळख बदलण्याचा विचारही त्यामागे होता.

दिवाणखान्यात बसून ग्रँड स्लॅम स्पर्धाचा आनंद लुटणे, या संकल्पनेतून बाहेर पडत आंतरराष्ट्रीय स्तरावरील अव्वल खेळाडूंना खेळताना प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळावी, या हेतूने आंतरराष्ट्रीय प्रीमिअर टेनिस लीगची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. खासगी जिमखाने, क्लब्स आणि सधन वर्गापुरती मर्यादित अशी टेनिसची ओळख बदलण्याचा विचारही त्यामागे होता. युवा खेळाडूंना, चाहत्यांना दिग्गजांना खेळताना पाहतानाच देशात टेनिस संस्कृती वाढू देण्याचा संयोजकांचा मानस होता. मात्र आयपीटीएलची तीन दिवसांची टेनिस मैफल सर्वसामान्य टेनिस चाहत्यांच्या आर्थिकदृष्टय़ा आवाक्याबाहेर गेल्याचे स्पष्ट झाले आहे. दुसऱ्या हंगामापासून कॉर्पोरेट बॉक्सची संख्या वाढवण्यात आली आहे. व्यावसायिकदृष्टय़ा किफायतशीर कॉर्पोरेट बॉक्समुळे संयोजकांचे उखळ पांढरे झाले आहे, मात्र सामान्य प्रेक्षक मात्र लीगपासून दुरावला आहे.

एका कॉर्पोरेट बॉक्सची किंमत ५० हजारांच्या घरात आहे. कॉर्पोरेट बॉक्सबरोबर पंचतारांकित आदरातिथ्याची सुविधा मिळते. कोर्टपासून अगदी नजीक बसून सामन्याचा आनंद लुटता येत असल्याने या बॉक्सेसला सधन वर्गाची पसंती मिळत आहे. आयपीटीएलची सगळ्यात कमी रकमेची तिकिटे चार हजार रुपयांपासून उपलब्ध आहेत, मात्र स्टेडियमपर्यंत येण्या-जाण्याचा आणि खाण्यापिण्याचा खर्च यात समाविष्ट नाही. तिकीट रकमेत हे समाविष्ट केल्यानंतर टेनिस मैफल भलतीच महागडी ठरणार असल्याने सामान्य चाहत्यांनी स्पर्धेपासून लांब राहण्याचे धोरण स्वीकारले आहे. अन्य शहरातून येणाऱ्या चाहत्यांना तीन दिवस राहण्याचा खर्चही पेलवायचा असल्याने टेनिस मेजवानी खिशाला भरुदड ठरू शकते. चार हजार रुपये खर्च करूनही स्टेडियमच्या शेवटच्या रांगांमध्ये बसून सामना पाहावा लागतो. कोर्ट दूरवर असल्याने घडामोडींची माहिती घेण्यासाठी मोठय़ा पडद्यावर विसंबून राहावे लागते. स्टेडियममध्ये बसून मोठय़ा पडद्यावर सामन्याचा आनंद घेण्यापेक्षा घरी दूरचित्रवाणीवर सामना पाहणे सोयीचे असल्याने नदाल रिकाम्या स्टँड्ससमोर खेळत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. चार हजार रुपयांची तिकिटे सहज उपलब्ध आहेत, तर ३४,५०० रुपयांच्या तिकिटांसमोर ‘हाऊसफुल्ल’ची पाटी असे परस्परविरोधी चित्र आयपीटीएलची तिकिटे उपलब्ध असलेल्या संकेतस्थळावर पाहायला मिळाले.

First Published on December 12, 2015 6:51 am

Web Title: fan followers reduce
टॅग Reduce
Next Stories
1 फेडरर-नदाल समोरासमोर
2 मी भविष्य वर्तवू शकत नाही -नदाल
3 आयपीएल परदेशी संघांच्या पथ्यावर -कोहली
Just Now!
X