आशिया चषकाच्या विजयानंतर भारतीय उपकर्णधार रोहित शर्मा सध्या स्थानिक क्रिकेट सामन्यामध्ये खेळत आहे. सामन्यादरम्यान चाहत्याने मैदानावर रोहित शर्माचे पाय धरले. काही वेळासाठी रोहित शर्मालाही काही उमगले नाही. अचानक चाहत्याने पाय धरल्यानंतर रोहित गोंधललेल्या अवस्थेत दिसून आला. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

विजय हजारे चषकामध्ये रोहित शर्मा मुंबई संघाकडून खेळत आहे. रविवारी मुंबई आणि बिहार यांच्या सामन्यादरम्यान हा प्रकार घडला आहे. सलामीसाठी आलेल्या रोहित शर्मा २१ धावांवर खेळत असताना एक चाहता मैदानावर आला. चाहत्याने प्रथम रोहितच्या पायावर आपले डोके ठेवून आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न केला. अचानक ओढावलेल्या या प्रसंगामुळे रोहित शर्मा थोडा गोंधळलेल्या अवस्थेत पहायला मिळाला. रोहित शर्माने त्याला उठवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याने रोहित शर्माची गळाभेट घेण्याचा प्रयत्नही केला.

 

याआधी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर , माजी कर्णधार सौरव गांगुली आणि एम.एस. धोनीसोबतही असाच प्रकरा घडला होता. गेल्या आठवड्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीसोबत सेल्फी घेण्यासाठी एका चाहत्याने सुरक्षा भेदून मैदानावर प्रवेश केला होता.

दरम्यान, मुंबईत झालेल्या विजय हजारे चषकातील उपांत्यापुर्व सामन्यात बलाढ्य मुंबईच्या संघाने बिहारचा ९ गड्यांनी पराभव केला. तुषार देशपांडेच्या धारधार गोलंदाजीच्या बळावर मुंबई संघाने बिहारचा अवघ्या ६९ धावांत खुर्दा उडवला. तुषारने २३ धावांच्या मोबदल्यात ५ गडी बाद केले. रोहित शर्माने या सामन्यात ३३ धावांची नाबाद खेळी केली. मुंबई आणि दिल्ली संघाने विजय हजारे चषकात उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.