विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचं नेतृत्व करणाऱ्या अजिंक्य रहाणेने ऐतिहासिक बॉक्सिंग डे कसोटीत आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवलं आहे. मेलबर्नच्या मैदानावर पाय रोवून कांगारुंच्या माऱ्याचा सामना करत अजिंक्य रहाणेने शतक झळकावलं आहे. गेल्या काही सामन्यांत अजिंक्यला सूर गवसत नव्हता, ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यातही अजिंक्य आपली छाप पाडण्यात अपयशी ठरला होता. मात्र विराट कोहली माघारी परतल्यानंतरही अजिंक्यने आपली जबाबदारी योग्य पद्धतीने सांभाळत शतक झळकावून पहिल्या डावात संघाला आघाडी मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली.

या शतकी खेळीनंतर सोशल मीडियावर चाहते आणि माजी दिग्गज खेळाडूंनीही अजिंक्यचं कौतुक केलंय.

अजिंक्यने दुसऱ्या दिवशी हनुमा विहारी आणि ऋषभ पंतसोबत अर्धशतकी तर रविंद्र जाडेजासोबत शतकी भागीदारी रचत भारतीय डावाला आकार दिला. दिवसाअखेरीस अजिंक्यने २०० चेंडूत १२ चौकारांनिशी १०४ धावा केल्या.