अ‍ॅशेस कसोटी मालिकेला आजपासून एजबॅस्टनच्याच मैदानात सुरुवात झाली. तीन आठवडय़ांपूर्वी झालेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात याच मैदानात इंग्लंडने पहिल्यावहिल्या विश्वविजेतेपदाला गवसणी घातली होती. त्यामुळेच पहिल्या कसोटीमध्येही ऑस्ट्रेलियावर पुन्हा वर्चस्व गाजवण्यासाठी इंग्लंडचा संघ सज्ज झाला आहे. नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. स्लेजिंगसाठी प्रसिद्ध असणाऱ्या या दोन्ही संघांच्या पहिल्याच कसोटीमध्ये प्रेक्षकांनीच ऑस्ट्रेलियाचा सलामीचा फलंदाज डेव्हिड वॉर्नरची स्लेजिंग केल्याचे पहायला मिळाले.

प्रथम फलंदाजी घेतल्यानंतर ऑस्ट्रेलियाची अडखळती सुरुवात झाली. सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि कॅमरॉन बॅनक्रॉफ्ट दोघेही स्वस्तात तंबूत परतले. स्टुअर्ट ब्रॉडने वॉर्नरला पायचित केले. वॉर्नर बाद होऊन तंबूत परतत असताना इंग्लंडच्या चाहत्यांनी चक्क ‘सॅण्ड पेपर’ दाखवत वॉर्नरला निरोप दिला. २०१७ साली मार्च महिन्यामध्ये झालेल्या कसोटीत डेविड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ आणि कॅमरॉन बॅनक्रॉफ्ट यांच्यावर चेंडू कुरतडल्याचा आरोप सिद्ध झाला होता. त्यानंतर या तिन्ही खेळाडूंवर बंदी घालण्यात आली होती. बंदी उठवल्यानंतर या वर्षी वॉर्नर आणि स्मिथ यांनी विश्वचषक स्पर्धेतून मैदानात पुरागमन केलं आहे.

ब्रॉडने टाकलेला चेंडू वॉर्नरच्या पुढच्या पायाच्या बरोबर मध्यभागी लागला. वॉर्नरला पंचांनी बाद दिल्यानंतर तो पॅव्हेलियनच्या दिशेने चालू लागला. अवघ्या दोन धावांवर बाद झालेला वॉर्नर पॅव्हेलियनकडे परत जात असताना इंग्लंडच्या चाहत्यांनी त्याला सॅण्ड पेपरचे तुकडे दाखवत त्याची हुर्यो उडवली.

या नंतर काही वेळाने ब्रॉडने आठ धावांवर बॅनक्रॉफ्टलाही बाद केले. १७ धावांमध्ये ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर तंबूत परतले होते. दरम्यान विश्वचषक स्पर्धेमध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यामध्ये भारतीय प्रेक्षकांनी स्मिथला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी भारताचा कर्णधार विराट कोहली याने भारतीय चाहत्यांना स्मिथला डिवचण्याऐवजी टाळ्या वाजवून चांगल्या खेळाला प्रोत्साहन देत टाळ्या वाजवा असा इशारा केला होता. यावेळी विराटच्या खिळाडूवृत्तीचे सर्व स्तरातून कौतुक झाले होते.