केंद्र सरकारने पारित केलेल्या शेतकरी कायद्यांविरोधात दिल्लीत गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारचे मंत्री आणि शेतकरी यांच्यात झालेल्या बैठकांमधून अद्याप तोडगा निघालेला नाही. विरोधी पक्षातील ज्येष्ठ नेतेमंडळीदेखील लवकरच या मुद्द्यावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत. शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी विरोधी पक्षांनी ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. याच पार्श्वभूमीवर आज पुरस्कार वापसी करण्यासाठी राष्ट्रपती भवनाच्या दिशेने जाणाऱ्या काही खेळाडूंना पोलिसांनी रस्त्यातच अडवल्याची घटना घडली.

शेतकऱ्यांसंबंधित कायद्याविरोधात सुरू असलेल्या संघर्षात खेळाडूंनीदेखील शेतकऱ्यांना पाठिंबा जाहीर केला. या कायद्यांच्या विरोधात निषेध म्हणून आपल्याला मिळालेले पुरस्कार परत करण्यासाठी आज दिल्लीत ३० खेळाडू राष्ट्रपती भवनात जाणार होते. धावपटू, कुस्तीपटू आणि इतर खेळाडू अशा एकूण ३० खेळाडूंचा गट राष्ट्रपती भवनाच्या दिशेने रवाना झाला असता दिल्ली पोलिसांनी त्यांना रस्त्यात अडवल्याची घटना घडली. आशियाई स्पर्धांमध्ये दोन वेळा सुवर्णपदकाची कमाई करणारे दिग्गज माजी कुस्तीपटू कर्तार सिंग हे या गटाचे नेतृत्व करत होते. पंजाब आणि आसपासच्या राज्यातील मिळून एकूण ३० खेळाडू आपले पुरस्कार परत देण्यासाठी निघाले होते, पण त्यांना रस्त्यात अडवलं अशी माहिती कर्तार सिंग यांनी दिली.

कर्तार सिंग यांना त्यांच्या समृद्ध कारकिर्दीसाठी १९८२ला अर्जुन पुरस्कार तर १९८७ला पुद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. कर्तार सिंग यांच्यासोबत ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावणारे माजी हॉकीपटू गुरमेल सिंग, महिला हॉकीच्या माजी कर्णधार राजबीर कौर यांसारखे दिग्गज ३० क्रीडापटू सुमारे ३५ पुरस्कार परत करण्यासाठी निघाले होते. “शेतकऱ्यांनी आम्हाला कायम पाठिंबा दिला आहे. आमचे शेतकरी बांधव कडाक्याच्या थंडीत रस्त्यावर बसले आहेत. त्यांच्यावर लाठीचार्ज केला जात आहे. या गोष्टी पाहून आम्हाला खूप दु:ख होत आहे”, असेही कर्तार सिंग म्हणाले.