परदेशातील खेळपट्टय़ांवर छाप पाडणाऱ्या भारताच्या वेगवान गोलंदाजांना शर्यतीमधील घोडय़ांप्रमाणे जपण्याची आवश्यकता आहे, असे मत भारताचे गोलंदाजीचे प्रशिक्षक भरत अरुण यांनी व्यक्त केले. सध्याचा गोलंदाजीचा ताफा हा सर्वोत्तम असल्याचेही त्यांनी सांगितले.

यंदाच्या वर्षांत भारताच्या वेगवान माऱ्यासह सर्वच गोलंदाजांनी परदेशातील सर्वच दौऱ्यांवर चुणूक दाखवली आहे. दक्षिण आफ्रिकेमधील तीन कसोटी सामन्यांत भारताने ६० बळी मिळवले होते. मग इंग्लंड दौऱ्यावरील कसोटी सामन्यांत ९० बळींपैकी ८२ बळी घेतले होते. आता ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेमधील अ‍ॅडलेडच्या पहिल्या सामन्यात भारताने २० बळी घेत मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली आहे.

‘‘मी फक्त अ‍ॅडलेडच्या कामगिरीवरून गोलंदाजांचे विश्लेषण करीत नाही. ऑस्ट्रेलियासह दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडमध्येही त्यांनी समाधानकारक कामगिरी केली आहे. हा भारताचा एक सर्वोत्तम वेगवान मारा आहे. वेगवान गोलंदाज हा कोणत्याही संघाचा मौल्यवान ठेवा असतो. त्यामुळेच त्यांची काळजी घेण्याची नितांत गरज असते,’’ असे अरुण यांनी सांगितले.

जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार आणि इशांत शर्मा विकसित झाले. कारण त्यांच्या कामगिरीत सातत्य होते. याबाबत अरुण म्हणाले, ‘‘सातत्य ही या तीन मालिकांआधी भारतीय गोलंदाजीची समस्या होती. यावर आम्ही गांभीर्याने मेहनत घेतल्यामुळे त्याचे फायदे आता दिसत आहेत. प्रत्येक गोलंदाजासोबत वैयक्तिक सराव केल्यामुळे या त्रुटी दूर झाल्या.’’

‘‘प्रत्येक वेळी गोलंदाजाला योजना देणे आणि ते राबवण्यासाठी काय करावे, हे सांगणे अतिशय सोपे असते. मग त्याबाबत अभिप्राय देऊन त्यांच्या कामगिरीत सातत्य आणता येते,’’ असे अरुण यांनी सांगितले.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याला शुक्रवारपासून ऑप्टस स्टेडियमवर प्रारंभ होणार असून, येथील खेळपट्टी ही वेगवान गोलंदाजांना साहाय्य करणारी आहे. या मैदानावर हा पहिलाच कसोटी सामना होणार आहे. दोन्ही संघांनी बुधवारी ‘वाका’ स्टेडियमवर सराव केला.