कर्नाटकातील कंबाला या पारंपरिक शर्यतीत उसेन बोल्टचा विक्रम मोडणारा श्रीनिवास गौडा सध्या चांगलाच चर्चेत आहे. बैलांसोबत पळण्याच्या शर्यतीत श्रीनिवासने १०० मी. चं अंतर अवघ्या ९.५५ सेकंदात पूर्ण केलं. या दरम्यान श्रीनिवासनने Fastest Man on Earth हा किताब मिळवलेल्या उसेन बोल्टचाही विक्रम मोडला. श्रीनिवासचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेक मान्यवर व्यक्तींनी, श्रीनिवासला ऑलिम्पिकसाठी प्रशिक्षण देण्याची मागणी केली. याची दखल घेत केंद्रीय क्रीडामंत्री किरेज रिजिजू यांनीही ‘साई’ (Sports Authority of India) च्या अधिकाऱ्यांना निर्देश देत, श्रीनिवासच्या प्रशिक्षणाची सोय केली. मात्र खुद्द श्रीनिवासलाच अ‍ॅथलीट बनण्यामध्ये रस नसल्याचं कळतंय.

“कंबाला शर्यतीत धावताना टाचांवरचं नियंत्रण हा खूप महत्वाचा भाग असतो, तर ट्रॅक शर्यतीमध्ये पावलांवरचं नियंत्रण महत्वाचं असतं. कंबाला शर्यतीत फक्त जॉकीच नव्हे तर बैलांचंही महत्व आहे. ट्रॅक शर्यतीत असा प्रकार नाहीये. कंबाला शर्यतींमध्ये भाग घेतल्यामुळे मी प्रचंड थकलो आहे, त्यामुळे मी ‘साई’च्या चाचणीसाठी जाईन की नाही हे स्पष्ट नाहीये. वयाच्या १५ व्या वर्षापासून मी हा खेळ खेळतोय त्यामुळे मला यापुढेही हाच खेळ खेळायचा आहे.” श्रीनिवास एक्स्प्रेस वृत्तसमुहाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होता.

कंबाला शर्यतीत भाग घेण्याव्यतिरीक्त श्रीनिवास बांधकाम मजूर म्हणून काम करतो. शनिवारीही श्रीनिवास मंगळुरुजवळील वेणूर परिसरात शर्यतीत सहभागी झाला होता.

“मी ‘साई’ च्या चाचणीकरता जाईन की नाही हे स्पष्ट नाहीये. पण मी बंगळुरुला जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. कोणताही निर्णय घेण्याआधी मला माझ्या प्रशिक्षकांचा सल्ला घ्यायचा आहे. मला आरामाचीही गरज आहे.” ANI वृत्तसंस्थेशी बोलताना श्रीनिवासने आपलं मत मांडलं. “लोकं माझी तुलना उसेन बोल्टसोबत करत आहेत. तो जग्गजेता आहे. मी फक्त शेतात होणाऱ्या पारंपरिक शर्यतीत पळणारा एक खेळाडू आहे. माझ्या यशात माझ्या दोन बैलांचाही मोलाचा वाटा आहे. ते खूप चांगले धावतात. मी त्यांचा पाठलाग करतो.”