वडिलांच्या निधनानंतर मायदेशी परतण्याचा विचार करीत होतो; परंतु मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या पाठबळ देणाऱ्या शब्दांनी माझे मतपरिवर्तन झाले, असे भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने सांगितले.

‘‘तू कसोटी सामना खेळ, पाहा तुला पाच बळी मिळतील. तुझ्या वडिलांचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी राहील,’’ असे शास्त्री यांनी मेलबर्नच्या दुसऱ्या कसोटीआधी सिराजला सांगितले होते. शास्त्री यांचे बोल खरे ठरले. २७ वर्षीय सिराजने मेलबर्न कसोटीत पदार्पण करताना ७७ धावांत ५ बळी मिळवले. सामन्यानंतर शास्त्री यांनी मला त्यांच्या वक्तव्याची आठवण करून दिली. प्रशिक्षक आपल्याला इतक्या उत्तम पद्धतीने प्रेरणा देतो, हे आत्मविश्वास उंचावणारे होते, असे सिराजने सांगितले.

सिराज विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुचे प्रतिनिधित्व करतो. ‘‘दोन वर्षांपूर्वी ‘आयपीएल’मध्ये माझी कामगिरी चांगली होत नव्हती. परंतु तरीही विराटने माझ्या कामगिरीवर विश्वास ठेवला आणि संघात कायम ठेवले,’’ असे विराटने सांगितले.

भारताचे पुरुष-महिला संघ इंग्लंडमध्ये दाखल

लंडन : न्यूझीलंडविरुद्धचा जागतिक कसोटी अजिंक्यपदाचा अंतिम फेरीचा सामना आणि त्यानंतर इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका यासाठी भारतीय पुरुष संघ गुरुवारी इंग्लंडमध्ये पोहोचला आहे. भारतीय पुरुष संघासह भारतीय महिला संघसुद्धा इंग्लंडला रवाना झाला आहे. महिला संघ ब्रिस्टल येथे एकमेव कसोटी सामना तसेच तीन ट्वेन्टी-२० आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. दोन्ही संघ साऊदम्पटन येथे प्रथम अनिवार्य विलगीकरण पूर्ण करतील. त्यानंतर १८ जूनपासून जागतिक अजिंक्यपदाचा सामना सुरू होईल.