इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या आगामी एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने आपला १८ सदस्यीय संघ जाहीर केला असून, यात पाकिस्तानमध्ये जन्मलेला लेग-स्पिनर फवाद अहमदचा समावेश करण्यात आला आहे.
३१ वर्षीय अहमदला गेल्याच महिन्यात ऑस्ट्रेलियाचे नागरित्व मिळाले आहे. इंग्लंडमध्ये झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स करंडक स्पध्रेत खेळणाऱ्या झेव्हियर डोहर्टीऐवजी अहमदला ऑस्ट्रेलियाच्या संघात स्थान देण्यात आले आहे.
‘‘झिम्बाब्वे आणि दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाचे प्रतिनिधित्व करताना फवादने सातत्यपूर्ण गोलंदाजीचे प्रदर्शन केले होते. त्यामुळेच ऑस्ट्रेलियाच्या फिरकी माऱ्याची धुरा त्यांच्याकडे सोपविण्यात आली आहे,’’ असे निवड समितीचे प्रमुख जॉन इनव्हरॅरिटी यांनी सांगितले.
पुढील वर्षी होणारी आयसीसी ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा आणि २०१५मध्ये होणाऱ्या आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धा डोळ्यांसमोर ठेवून हा संघ निवडण्यात आला आहे, असे त्यांनी पुढे सांगितले. ऑस्ट्रेलियाचा संघ इंग्लंडविरुद्ध पाच एकदिवसीय आणि दोन ट्वेन्टी-२० सामने खेळणार आहे. याशिवाय एडिनबर्ग येथे स्कॉटलंडविरुद्धही एक सामना खेळणार आहे.
ऑस्ट्रेलयाचा संघ : मायकेल क्लार्क (एकदिवसीय संघाचा कर्णधार), जॉर्ज बेली (ट्वेन्टी-२० संघाचा कर्णधार), फवाद अहमद, नॅथन कल्टर-निले, जेम्स फॉल्कनर, आरोन फिन्च, जोश हॅझलेवूड, फिल ह्युजेस, मिचेल जॉन्सन, शॉन मार्श, ग्लेन मॅक्सवेल, क्लिंट मकाय, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, अ‍ॅडम व्होग्स, मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर, शेन वॉटसन.