18 December 2017

News Flash

गुजरात / हिमाचल प्रदेश निवडणूक निकाल २०१७

‘हम हिंदुस्तानी’..

इराणच्या खेळाडूंची भावना

मिलिंद ढमढेरे, अहमदाबाद | Updated: August 13, 2017 1:59 AM

फझल अत्राचाली व अबोझर मोहाजेरमिघानी

इराणच्या खेळाडूंची भावना

प्रो कबड्डी लीगमध्ये आम्ही मनापासूनच सहभागी झालो असून भारताच्या राष्ट्रगीताने आम्हालाही भारावून टाकले आहे. आम्ही शरीराने इराणचे असलो तरी मनाने आम्ही भारतीयच झालो आहोत, ही भावना इराणच्या फझल अत्राचाली व अबोझर मोहाजेरमिघानी कबड्डीपटूंनी व्यक्त केली.

इराणचे हे दोन्ही खेळाडू गुजरात फॉच्र्युन जायंट्सचे प्रतिनिधित्व करीत आहेत. फझल हा या लीगच्या पहिल्या हंगामापासून खेळत आहे. त्याने यापूर्वी यु मुंबा व पाटणा पायरेट्सचे प्रतिनिधित्व केले आहे. अबोझरचा हा पहिलाच हंगाम आहे. पदार्पणातच अबोझरला या लीगमध्ये ५० लाखांचे मानधन मिळाले आहे. अहमदाबाद येथेच यंदा झालेल्या विश्वचषक स्पर्धेत त्याने क्षेत्ररक्षणामध्ये चमक दाखवली होती. त्यामुळेच त्याला प्रो कबड्डीमध्ये संधी मिळाली.

एवढी मोठी बोली लाभेल असे वाटले होते काय, असे विचारले असता अबोझर म्हणाला, ‘‘साधारणपणे १५ ते २० लाख रुपयांची बोली मला अपेक्षित होती. मात्र ५० लाख रुपये ही माझ्यासाठी लॉटरी आहे. माझा नुकताच विवाह झाला असल्यामुळे मी या रकमेचा नवीन घर व मोटार घेण्यासाठी विनियोग करणार आहे. प्रो कबड्डीचे नियम आशियाई स्पर्धेच्या नियमांपेक्षा वेगळे आहेत. त्यामुळे मला पहिल्या दोन-तीन सामन्यांमध्ये अडचण आली. विशेषत: पंचांशी हुज्जत घातल्यानंतर विरुद्ध संघाला तांत्रिक गुण का बहाल केले जातात, हे मी येथे शिकलो आहे. आता पुन्हा तसे वर्तन माझ्याकडून होणार नाही. या सामन्यांचा अनुभव मला आगामी आशियाई क्रीडा स्पध्रेसाठी होणार आहे.’’

फझलकडे उपकर्णधार पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. याबाबत तो म्हणाला, ‘‘यु मुंबा व पाटणा या दोन्ही विजेत्या संघांकडून खेळलो आहे. गुजरात संघातील बरेचसे खेळाडू नवोदित आहेत. त्यामुळेच माझ्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी आली आहे. संघातील खेळांडूंमध्ये योग्य समन्वय ठेवण्यावर मी भर देत आहे. या लीगमधील सर्वच दिग्गज खेळाडूंचे कौशल्य मी पाहिले आहे. प्रत्येक सामन्यापूर्वी मी तीन-चार तास अगोदर आपल्या प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंबाबतच विचार करतो व त्यानुसार मी खेळाचे नियोजन करतो. सुदैवाने अन्य खेळाडूंकडूनही मला चांगले सहकार्य मिळत आहे. कर्णधार सुकेश हेगडेचे योग्य मार्गदर्शन मला मिळत आहे.’’

‘‘प्रो कबड्डीमध्ये मिळालेल्या पैशाचा विनियोग मी घरखरेदीसाठी करणार आहे. मी नोकरी करीत नसल्यामुळे येथील उत्पन्न माझ्यासाठी मोठा आर्थिक आधार आहे. आणखी सात ते आठ वर्षे स्पर्धात्मक कबड्डी खेळणार आहे. त्यानंतर मी प्रशिक्षक म्हणून काम करणार आहे. कबड्डी हाच माझा श्वास असेल,’’ असेही फझलने सांगितले.

‘‘इराणमध्येही व्यावसायिक लीग आयोजित केली जाते. या लीगमध्ये तेथील राष्ट्रीय दर्जाचे १३-१४ संघ सहभागी होत असतात. त्यासाठी तीनशेहून अधिक खेळाडूंची निवड केली जाते. त्यामधून या संघांची निवड केली जाते. मात्र कामगिरीच्या आधारे मोजक्याच खेळाडूंना घसघशीत आर्थिक उत्पन्न मिळते. अन्य खेळाडूंना नाममात्र फायदा मिळतो, तरीही अनुभव मिळवण्यासाठी अनेक खेळाडू भाग घेतात. या लीगमधील कामगिरीच्या आधारे आमच्या देशाचा संघ निवडला जातो. त्यामुळेही अनेक नवोदित खेळाडूही त्यामध्ये भाग घेतात,’’ असे फझलने सांगितले.

 

 

First Published on August 13, 2017 1:59 am

Web Title: fazel atrachali abozar mohajermighani pro kabaddi league