लिऑनवर मोठा विजय मिळवण्यात भरघोस योगदान देत लिओनेल मेसीने बार्सिलोनाला चॅम्पियन्स लीगच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचवले. दोन गोल स्वत: करतानाच मेसीने दोन गोलसाठी चाली रचत ५-१ असा मोठा विजय मिळवून दिला.

युवेंटससाठी ख्रिस्तियानो रोनाल्डोने तीन गोल केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मेसीनेदेखील त्याच्या संघासाठी कमाल कामगिरी करून दाखवली. मागील लढतीत लिऑनने बार्सिलोनाला ०-० असे बरोबरीत रोखल्याने यावेळी त्यांचा संघ अधिक आक्रमकपणे खेळण्याची चिन्हे होती. त्यामुळे बार्सिलोना बचावात्मक खेळ करण्याची शक्यता होती. मात्र मेसीच्या अत्यंत प्रभावी खेळाने संपूर्ण सामन्याचे चित्रच पालटून गेले. सामन्याच्या १७व्या मिनिटालाच मेसीने पहिला गोल लगावत संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर फिलीप कुटिन्होने ३१ व्या मिनिटाला अजून एक गोल लगावत संघाच्या आघाडीत भर घातली. त्यामुळे पूर्वार्धातच बार्सिलोना संघाकडे विजयी आघाडी जमा झाली. उत्तरार्धात ५८व्या मिनिटाला लिऑनच्या लुकास उसार्टने पहिला गोल करीत ही आघाडी कमी केली. मात्र, ७८व्या मिनिटाला मेसीने त्याचा दुसरा आणि संघाचा तिसरा गोल नोंदवला. जेरार्ड पिकने ८१ व्या मिनिटाला तर उस्मान डेम्बलेने ८६ व्या मिनिटाला गोल लगावत बार्सिलोनाला ५-१ असा दणदणीत विजय मिळवून दिला.