मडगांव : भारतात प्रथमच आयोजित करण्यात येणाऱ्या एएफसी चॅम्पियन्स लीग फुटबॉलला बुधवारपासून प्रारंभ होणार आहे. आशिया खंडातील सर्वोत्तम फुटबॉल क्लब्समध्ये खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणारा एफसी गोवा हा एकमेव संघ ठरणार असल्याने त्यांच्या कामगिरीकडे तमाम फुटबॉलप्रेमींचे लक्ष लागले आहे.

जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर होणाऱ्या पहिल्या सामन्यात गोव्याची कतारच्या अल-रयानशी गाठ पडणार आहे. त्यामुळे घरच्या मैदानावर खेळण्याचा लाभ उचलण्यात एडू बेडियाच्या नेतृत्वाखालील गोव्याचा संघ यशस्वी ठरणार का, हे पाहणे रंजक ठरेल. ‘इ’ गटात गोवा, अल-रयानव्यतिरिक्त अल-वाहदा, पस्र्पोलिस या संघांना स्थान देण्यात आले आहे.

इंडियन सुपर लीग फुटबॉलच्या (आयएसएल) २०१९-२०च्या हंगामात गोव्याला उपांत्य फेरीत पराभूत व्हावे लागले. परंतु साखळी सामन्यांच्या अखेरीस ते गुणतालिकेत आघाडीवर होते. त्यामुळे एएफसी चॅम्पियन्स लीगसाठी पात्र ठरण्याचा त्यांनी मान मिळवला.

’ वेळ : रात्री १०.३० वा.

’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स ३