पुरुष संघाची श्रीलंकेवर सहज मात; महिलांचे मालदीववर वर्चस्व

मुंबई : पुणे येथील पीवायसी हिंदू जिमखान्यावर झालेल्या फेडरेशन चषक आंतरराष्ट्रीय कॅरम स्पर्धेत यजमान भारताच्या पुरुष आणि महिला संघांनी विजेतेपदाची कमाई केली. पुरुष संघाने श्रीलंकेला, तर महिलांनी मालदीवला नमवून जेतेपद मिळवले.

प्रशांत मोरे, झहीर पाशा, इर्शाद अहमद आणि राजेश गोहिल यांचा समावेश असलेल्या भारतीय संघाने पुरुष गटाच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेला ३-० अशी धूळ चारली. एकेरीच्या पहिल्या लढतीत प्रशांतने २०१२च्या विश्वविजेत्या निशांत फर्नाडोला २५-१, २५-७ असे पराभूत केले. दुसऱ्या सामन्यात स्विस लीग विजेत्या झहीरने शाहीद इल्मीवर २५-१०, २५-१६ अशी सरशी साधली. दुहेरीच्या लढतीत इर्शाद आणि राजेश यांच्या जोडीने श्रीलंकेच्या दिनेश दुलक्षणे आणि अनास अहमद यांचा २५-१४, २५-४ असा फडशा पाडून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. तिसऱ्या क्रमांकासाठीच्या सामन्यात बांगलादेशने मालदीवला २-१ असे नमवले.

महिला गटातील विजेता भारतीय संघ आणि प्रशिक्षक मारिया इरुदयम (मध्यभागी).

राष्ट्रीय विजेती रश्मी कुमारी, ऐशा खोकावाला, माजी विश्वविजेती एस. अपूर्वा आणि के. नागज्योती यांचा समावेश असलेल्या भारताच्या महिला संघाने मालदीवला ३-० असे नेस्तनाबूत केले. एकेरीच्या पहिल्या सामन्यात रश्मीने अमिनाथ विधाधचा २५-१०, २५-० असा धुव्वा उडवला. दुसऱ्या एकेरीत अनुभवी अपूर्वापुढे अमिनाथ विषमचा निभाव लागला नाही. अपूर्वाने तिच्यावर २५-५, २५-५ असे वर्चस्व गाजवले. तर दुहेरीच्या सामन्यात ऐशा आणि नागज्योती या भारतीय जोडीने अमिनाथ सुबा आणि फातियाम रायना यांच्यावर २५-८, २५-१४ अशी मात करून भारताचा विजय साकारला. तिसऱ्या स्थानासाठीच्या लढतीत श्रीलंकेने बांगलादेशविरुद्ध ३-० असे यश संपादन केले.

या स्पर्धेत एकूण १६ ‘ब्रेक टू फिनिश’ची नोंद झाली. त्यापैकी भारताच्या झहीर पाशानेच सर्वाधिक सात ‘ब्रेक टू फिनिश’ नोंदवण्याचा पराक्रम केला.