हिमाचल प्रदेशचा सलग तिसरा विजय, बाद फेरीतील प्रवेशावर शिक्कामोर्तब

भारतीय रेल्वेच्या महिला संघाने सलग दुसऱ्या विजयासह फेडरेशन चषक कबड्डी स्पध्रेची उपांत्य फेरी गाठली. याचप्रमाणे हिमाचल प्रदेशने सलग तिसऱ्या विजयासह बाद फेरी गाठली. पुरुषांमधील रोमहर्षक लढतीत कर्नाटकने सेनादलाचा ३३-३२ असा पराभव केला, तर उत्तर प्रदेशने राजस्थानचा ३९-२२ असा पराभव केला.

जोगेश्वरी येथील एसआरपीएफ मैदानावर चालू असलेल्या या स्पध्रेतील महिलांच्या ब-गटातील सामन्यात भारतीय रेल्वेने केरळविरुद्ध २१-९ अशी आघाडी घेतली. त्यानंतर ४१-१८ अशा फरकाने आरामात केरळचे आव्हान संपुष्टात आणले. रेल्वेने पहिल्या सत्रात दोन आणि दुसऱ्या सत्रात दोन असे एकूण चार लोण केरळवर चढवले. रेल्वेने मध्यंतरानंतर संघातील पाच खेळाडू बदलले. रेल्वेच्या सोनाली शिंगटेने ११ चढायांमध्ये ८ गुण (३ बोनस) मिळवत विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. रेखा सावंतने पकडीचे पाच गुण मिळवून तिला छान साथ दिली. केरळच्या ऐश्वर्या एसएने (९ गुण) दिमाखदार खेळ केला. हिमाचल प्रदेशने अ-गटात उत्तर प्रदेशचे आव्हान ३५-१४ असे मोडीत काढले. हिमाचलच्या निधी शर्माने १० चढायांमध्ये ७ गुण मिळवले. सुषमा शर्माची तिला उत्तम साथ लाभली. त्यांच्या सारिकाने पकडींचे ८ गुण कमावले.

पुरुषांच्या ब-गटातील लढतीत कर्नाटकने सेनादलाविरुद्ध पहिल्या सत्रातच १४-१२ अशी आघाडी मिळवली. मग उत्तरार्धात अखेरच्या चढाईपर्यंत सामन्यातील संघर्ष टिकून होता. भारतीय रेल्वेला गटातून बाहेर काढण्यासाठी सेनादलाने हा पराभव पत्करल्याची चर्चा कबड्डीवर्तुळात होती. कर्नाटकच्या प्रशांत कुमार रायने चतुरस्र चढाया करताना २२ चढायांमध्ये १५ गुण (४ बोनस) मिळवले. शब्बीर बापूनेही उत्तम खेळ केला. सेनादलाकडून नितीन तोमर (१६ चढायांमध्ये ८ गुण) आणि मोनू गोयल (१९ चढायांमध्ये ११ गुण) यांनी चमकदार चढाया केल्या. त्यांच्या गुरुनाथ मोरेने एका चढाईत चार गुण मिळवून सर्वाचे लक्ष वेधून घेतले.

अ-गटातील सामन्यात उत्तर प्रदेशने पहिल्या सत्रात १९-११ अशी आघाडी घेतली आणि उत्तरार्धातसुद्धा ती टिकवली. उत्तर प्रदेशने राजस्थानवर दोन लोण चढवले. उत्तर प्रदेशच्या अवनिश कुमार आणि अभिषेक सिंगने प्रत्येकी आठ गुण मिळवले. राजस्थानच्या महेंद्रसिंग आणि रोहित कुमार यांनी अप्रतिम खेळाचे प्रदर्शन केले.