पुरुष संघाचा उत्तर प्रदेशवर रोमहर्षक विजय, तर महिलांकडून केरळचा धुव्वा

महाराष्ट्राच्या पुरुष व महिला संघांनी तिसऱ्या फेडरेशन चषक कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी दिली. मात्र महिलांच्या तुलनेत पुरुष संघाला विजयासाठी जबरदस्त संघर्ष करावा लागला. राष्ट्रीय स्पर्धेचे जेतेपद पटकावणाऱ्या पुरुष संघाला उत्तर प्रदेशने झुंजवले. पुरुषांनी ३४-३३ अशा फरकाने विजय मिळवला, तर महिलांनी केरळवर ४७-२१ अशी सहज मात केली. भारतीय कबड्डी महासंघ व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने व मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या यजमानपदाखाली शुक्रवारपासून जोगेश्वरी येथील एसआरपी मैदानावर या स्पर्धेला शानदार सुरुवात झाली.

महिलांच्या ब-गटातील उद्घाटनीय सामन्यात महाराष्ट्राने मध्यंतराला १७-१० अशी आघाडी घेतली होती. कोमल देवकर, सायली केरीपाळे यांच्या चढाया, तर अभिलाषा म्हात्रेच्या भक्कम पकडी यामुळे हा विजय मिळाला. कोमलने ५ चढायांत ८ गुण मिळवले. सायलीने १० चढायांत ८ गुण मिळवले. अभिलाषाने ४ पकडी यशस्वी केल्या. महाराष्ट्राने एकूण तीन लोण दिले. केरळसाठी विद्याने ४ गुण मिळवले.

पुरुषांच्या अ-गटात महाराष्ट्राने मध्यंतराला २०-१६ अशी चार गुणांची आघाडी घेतली होती. मात्र उत्तर प्रदेशने त्यांना चांगलेच झुंजवले. महाराष्ट्राकडून रिशांक देवाडिगाने २२ चढायांत १ बोनस व ८ गुण मिळवले. नीलेश साळुंखेने चढाईत ७, तर पकडीत ३ गुण कमावत विजयात महत्त्वाचा वाटा उचलला. पुरुषांच्या लढतीत पंचांच्या सदोष निर्णयावर दोन्ही संघांनी नाराजी प्रकट केली.

तांत्रिक गुणफलकाची उणीव

तंत्रज्ञानाची कास पकडून स्थानिक कबड्डीत प्रयोग होत असताना फेडरेशन चषक स्पर्धेत पहिल्याच दिवशी उणिवा जाणवल्या. कोणता संघ कोणाविरुद्ध खेळतोय, याशिवाय नक्की किती गुण आहेत हेही कळत नव्हते. गुणफलक नसल्याने उपस्थित प्रेक्षकांना कोणता संघ आघाडीवर असेल, याचा अंदाज बांधावा लागत होता.

मुंबईत इनडोअर स्टेडियम बांधणार -ठाकरे

महाराष्ट्रातील ही मातीवरील कबड्डी आता मॅटवर आली असली तरी खेळाडूंना मातीशी नाते तुटू देऊ नका, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. मुंबईत मॅटवर खेळाडूंना सराव करण्यासाठी इनडोअर स्टेडियम उभारले जाईल, असे आश्वासान त्यांनी दिले. ते म्हणाले, ‘‘बुवा साळवी यांचे स्मरण केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. मातीवरील कबड्डी सामने सुरू ठेवा. मॅटवर सराव करता यावा, यासाठी मुंबई महानगरपालिका लवकरच इंडोअर स्टेडियम उभारेल.’’   – शिवसेनेचा शासनावर भरवसा नाय!

ठाकरे यांनी सत्ताधारी मित्र भारतीय जनता पार्टीला कोपरखळी मारली. ते म्हणाले, ‘‘शासनाच्या भरवशावर वचन देणार नाही. शासन आणि आमचे नाते जगजाहीर आहे. त्यामुळे इंडोअर स्टेडियम उभारण्याची जबाबदारी पालिका घेईल. कबड्डीच्या मैदानाबाहेर राजकीय कबड्डी खेळणारे आज या स्पर्धेच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर आले आहेत.’’ राजकीय पुढाऱ्यांच्या भाषणांमुळे सामने २५ मिनिटे उशिराने सुरू झाले.

महिला कर्णधाराबाबत गोंधळ

फेडरेशन चषक कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला संघाचे नेतृत्व सायली जाधवकडे सोपवण्यात आले आहे. मात्र स्पर्धेच्या उद्घाटनीय सोहळ्यातील शपथविधी समारंभात सयोजकांनी अभिलाषा म्हात्रेचा कर्णधार म्हणून उल्लेख केला. त्यामुळे या स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला संघाचे नेतृत्व नक्की कोण करणार आहे, हा संभ्रम निर्माण झाला.