उगवत्या सूर्याचा देश असलेल्या जपानचे प्रतिनिधित्त्व करणाऱ्या केई निशिकोरीने फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारत ऐतिहासिक विजय मिळवला. ८२ वर्षांनंतर या स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठणारा निशिकोरी पहिला जपानी खेळाडू ठरला आहे. निशिकोरीने रशियाच्या तेयमुराझ गाबासिव्हलीवर ६-३, ६-४, ६-२ असा विजय मिळवला.
रविवारच्या बहुतांशी लढतींना पावसाचा फटका बसला. महिलांमध्ये अ‍ॅना इव्हानोव्हिक आणि एलिना स्वितोलिना यांनी चौथ्या फेरीत विजयी आगेकूच केली. १९३१ ते १९३३ या कालावधीत जपानच्या जिरो सतोहने फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. दरम्यान निशिकोरीचा पुढचा मुकाबला जो विलफ्रेड सोंगाशी होणार आहे. जो विलफ्रेंड सोंगाने चौथ्या मानांकित टॉमस बर्डीचवर ६-३, ६-२, ६-७, ६-३ असा शानदार विजय मिळवला.
सातव्या मानांकित इव्हानोविकने रशियाची खेळाडू एकतेरिना माकारोवाचा ७-५, ३-६, ६-१ असा पराभव केला. सर्बियन खेळाडू इव्हानोविक हिने सव्‍‌र्हिस व परतीचे फटके यावर चांगले नियंत्रण राखले होते. तिने बेसलाइन व्हॉलीजचाही सुरेख खेळ केला.  
युक्रेनच्या स्वितोलिना हिला स्थानिक खेळाडू अ‍ॅलिझ कॉर्नेट हिने दुसऱ्या सेटमध्ये चिवट लढत दिली. तथापि स्वितोलिना हिने सव्‍‌र्हिस व फोरहँडचे फटके यावर नियंत्रण ठेवीत हा सामना ६-२, ७-६ (११-९) असा जिंकला. एलिना स्वितोलिनाने स्थानिक खेळाडू अ‍ॅलिझ कॉर्नेटवर ६-२, ७-६ अशी मात केली.
पेस, बोपण्णा यांचे  आव्हान संपुष्टात
भारताच्या लिअँडर पेस व रोहन बोपण्णा यांना दुहेरीत पराभवाचा सामना करावा लागला. पेस व कॅनडाचा डॅनियल नेस्टॉर यांना इटलीच्या सिमोनी बोलेल्ली व फॅबिओ फोगनिनी यांनी ६-२, ६-४ असे सरळ लढतीत पराभूत केले. या तुलनेत बोपण्णा याला संघर्षपूर्ण लढतीनंतर पराभव स्वीकारावा लागला. होरिओ तेकाऊ (रुमानिया) व जीन ज्युलियन रॉजर (नेदरलँड्स) यांनी बोपण्णा व फ्लोरियन मेर्गिया यांच्यावर ६-३, ६-७ (७-९), ६-३ अशी मात केली.
सानिया-हिंगिस उपांत्यपूर्व फेरीत
अव्वल मानांकित सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगिस जोडीने महिला दुहेरीत उपांत्यपूर्व फेरीत आगेकूच केली. मिर्झा-हििगस जोडीने करिन नॅप आणि रॉबर्टा व्हिन्सी जोडीवर ६-१, ६-४ असा विजय मिळवला. लिएण्डर पेस
आणि रोहन बोपण्णा यांना पराभवाला सामोरे जावे लागल्याने सानिया मिर्झावर भारतीय चाहत्यांचा आशा एकवटल्या आहेत.