फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा

 

स्वित्झर्लंडचा मातब्बर टेनिसपटू रॉजर फेडरर आणि स्पेनचा राफेल नदाल यांनी मंगळवारी फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. त्यामुळे गुरुवारी रंगणाऱ्या उपांत्य लढतीत हे दोघे पारंपरिक प्रतिस्पर्धी एकमेकांविरुद्ध उभे ठाकणार आहेत. महिलांमध्ये ब्रिटनच्या जोहना कोंतानेसुद्धा उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले.

पुरुष एकेरीच्या साडेतीन तास रंगलेल्या पहिल्या उपांत्यपूर्व तिसऱ्या मानांकित फेडररने स्वित्झर्लंडच्याच २४व्या मानांकित स्टॅनिस्लास वॉवरिंकाचा ७-६ (७-४), ४-६, ७-६ (७-५), ६-४ अशा संघर्षपूर्ण सामन्यात पराभव केला. दुसऱ्या मानांकित नदालला जपानच्या सातव्या मानांकित केई निशिकोरीला धूळ चारण्यासाठी फारशी मेहनत घ्यावी लागली नाही. नदालने ६-१, ६-१, ६-३ असा विजय मिळवला.

महिलांमध्ये २६व्या मानांकित जोहनाने सातव्या मानांकित स्लोआने स्टीफन्सचा ६-१, ६-४ असा सरळ दोन सेटमध्ये धुव्वा उडवला. उपांत्य फेरीत जोहनापुढे पेट्रा मॅट्रिक किंवा मार्केटा वेंड्रसकोव्हा यांच्यातील विजेतीचे आव्हान असेल.