‘‘पारंपरिक स्वरूपाच्या टेनिसचा मी चाहता आहे. याच व्यवस्थेतली ‘गेम-सेट’ तसेच गुणांकन पद्धती मला आवडते. या लीगच्या निमित्ताने वेगळ्या स्वरूपाचे टेनिस खेळण्याची संधी मिळाली. मात्र या लीगमुळे वैयक्तिक खेळाला योगदान नाही,’’ असे परखड मत १७ ग्रँड स्लॅम विजेत्या रॉजर फेडररने व्यक्त केले. ‘‘चाहत्यांच्या आवाजी पाठिंब्यात, संगीताच्या तालावर संघासाठी खेळणे सर्वस्वी नवीन अनुभव होता. तूर्तात तरी हंगामाच्या शेवटी होणारी ही लीग म्हणजे नव्या हंगामापूर्वी स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्याचा उत्तम मार्ग आहे,’’ असे त्याने सांगितले.
‘‘लीगचे नियम चक्रावून टाकणारे आहेत. सव्‍‌र्हिसच्या वेळी सव्‍‌र्हिस करताना चूक झाल्यास प्रतिस्पध्र्याला गुण मिळतो. हा नियम अनाठायी आहे. शॉट क्लॉकच्या नियमामुळे दडपण वाढते. दुखापती टाळण्याच्या दृष्टीने बदली खेळाडूचा नियम समर्पक आहे,’’ असे फेडररने आवर्जून सांगितले.  
‘‘लीगचे स्वरूप टीव्ही प्रक्षेपणाला समोर ठेवून तयार करण्यात आले आहे. धमाल-मस्ती स्वरूपाचे हे मनोरंजन टेनिस आहे. टेनिसपटू वैयक्तिक पातळीवर खेळत असतात. लीगमुळे एकत्र येत एकमेकांना प्रोत्साहन देत एकटेपणा घालवण्याची ही चांगली संधी आहे. आराखडा वेगळा असला तरी खेळण्याचे गांभीर्य पारंपरिक आहे,’’ असे तो या वेळी म्हणाला.
‘‘लीगच्या निमित्ताने पहिल्यांदाच भारतीय चाहत्यांसमोर खेळण्याची संधी मिळाली. हा अनुभव विलक्षण होता. मी भारतात येणार असल्याचे ‘ट्विटर’च्या माध्यमातून जाहीर केले होते. त्यालाही प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. मात्र इथे येईपर्यंत एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर चाहत्यांची अपेक्षा केली नव्हती. त्यांच्या प्रतिसादाने भारावून गेलो आहे. माझे नाव उच्चारल्यानंतर प्रेक्षकांनी केलेला जल्लोष सुखद धक्का होता,’’ असे फेडररने उत्साहाने सांगितले.
लीगमध्ये किती दिवस खेळणार, हे निश्चित होते का, याविषयी विचारले असता फेडरर म्हणाला, ‘‘पाठीच्या दुखण्यामुळे मी एटीपी स्पर्धेतून माघार घेतली होती. मात्र या दुखापतीतून सावरल्यामुळे डेव्हिस चषकात स्वित्र्झलडचे प्रतिनिधित्व केले. नव्या हंगामापूर्वी तंदुरुस्त राहणे अत्यावश्यक आहे. तसेच भरगच्च नव्या हंगामाआधी कुटुंबाला वेळ देणेही गरजेचे होते. त्यामुळे लीगमध्ये मी दोनच दिवस खेळू शकेन, याची कल्पना भूपती आणि लीग व्यवस्थापनाला दिली होती.’’
‘‘स्वित्र्झलडला पहिलेवहिले डेव्हिस चषक जेतेपद मिळवून देण्याचा अनुभव भावनिक होता. संघातील बहुतांशी खेळाडू माझे मित्रच आहेत. एकत्रित कामगिरीच्या जोरावर देशवासीयांना अभिमान वाटेल अशी कामगिरी करता आल्याने समाधानाची भावना आहे. जगभरातल्या आतापर्यंत न खेळलेल्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न आहे, मात्र चेन्नई खुल्या स्पर्धेच्या वेळी ब्रिस्बेन स्पर्धा आयोजित होते. त्यामुळे चेन्नईत येता येणार नाही,’’ असे फेडररने स्पष्ट केले.