News Flash

फेडररचे त्रिशतक!

स्वित्र्झलडच्या रॉजर फेडररने आपल्या पराक्रमाने समस्त टेनिसविश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे.

विक्रमी ग्रँड स्लॅम सामने जिंकणारा पहिला पुरुष टेनिसपटू

स्वित्र्झलडच्या रॉजर फेडररने आपल्या पराक्रमाने समस्त टेनिसविश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे. ग्रँड स्लॅम सामने जिंकण्याचे त्रिशतक साजरे करणारा फेडरर हा पहिलावहिला पुरुष टेनिसपटू ठरला आहे. ग्रिगोर दिमित्रोव्हला पराभूत करून त्याने हा ऐतिहासिक टप्पा गाठला.

तीनशेवा ग्रँड स्लॅम सामना जिंकणे, ही अतिशय आनंददायी अनुभूती आहे, असे फेडररने सांगितले. आता मार्टिना नवरातिलोव्हाचा ३०६ ग्रँड स्लॅम विजयांचा विक्रम त्याला साद घालतो आहे. याचप्रमाणे कारकीर्दीतील पाचवे ऑस्ट्रेलियन विजेतेपद जिंकण्यासाठी तो उत्सुक आहे.

१७ ग्रँड स्लॅम विजेतेपदे नावावर असणाऱ्या टेनिसजगतातील या सम्राटाने दोन तास ४० मिनिटे रंगलेल्या लढतीत दिमित्रोव्हचा ६-४, ३-६, ६-१, ६-४ असा पराभव केला. पुढील फेरीत बेल्जियमच्या १५व्या मानांकित डेव्हिड गॉफिनशी त्याचा सामना होणार आहे.

१९९९मध्ये ऑस्ट्रेलियन खुल्या स्पध्रेच्या रणांगणावर फेडररच्या ग्रँड स्लॅम विजयाच्या अध्यायाला प्रारंभ झाला होता. त्या वेळी फेडररने मायकेल चँगला पहिल्याच फेरीत हरवले होते. तीनशेव्या विजयाबाबत फेडरर म्हणाला, ‘‘गतवर्षी मी कारकीर्दीतील हजाराव्या विजयाची नोंद केली. तो माझ्यासाठी महत्त्वाचा क्षण होता. असे घडेल अशी मी कल्पना केली नव्हती. परंतु जेव्हा घडले तेव्हा स्वाभाविकपणे माझ्यासाठी ते खास होते. आताचा हा क्षणसुद्धा मी अत्यानंदाने जगतो आहे.’’

बल्गेरियाच्या दिमित्रोव्हला ‘बेबी फेड’ या टोपणनावाने ओळखले जाते. या स्पध्रेत २७वे मानांकन लाभलेल्या दिमित्रोव्हविरुद्ध विजय साजरा करून इतिहासात आपले नाव अधोरेखित करणे फेडररला जड गेले नाही. याचप्रमाणे फेडररने दिमित्रोव्हविरुद्धची विजयाची कामगिरी ५-० अशी वर्चस्वपूर्ण राखली आहे. गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियन स्पध्रेच्या तिसऱ्या फेरीत इटलीच्या आंद्रेस सेप्पीकडून फेडररला पराभवाचा धक्का बसला होता. मात्र या वेळी तिसऱ्या फेरीत फेडररने कोणतीही चूक केली नाही.

‘‘ग्रिगोर अप्रतिम खेळत होता. दुसरा सेट गमावल्यानंतर मला सामन्यात परतणे कठीण आव्हान होते. मी या सामन्यात झगडत होतो. मात्र तिसऱ्या सेटमध्ये माझी सुरुवात चांगली झाली. त्यानंतर मात्र सव्‍‌र्हिस आणि पदलालित्याने मला छान साथ दिली. त्यामुळे एका नेत्रदीपक विजयाची नोंद करता आली,’’ असे फेडररने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2016 4:28 am

Web Title: federer reaches 300 grand slam victories with four set win over dimitrov
टॅग : Federer,Grand Slam
Next Stories
1 शारापोव्हाचा सहाशेवा विजय
2 ‘भारताने शेवट तरी गोड करावा..’
3 ग्लेन मॅक्सवेलच्या टीकेशी स्मिथ, फिन्च असहमत
Just Now!
X