वाघ म्हटलं की शिकारीसाठी सावजाच्या शोधात गुरगुरणारा, पाहताच धडकी भरेल असे उग्र डोळे आणि भारदस्त शरीर, प्रत्येक पावलागणीक सळसळत्या चैतन्यमयी ऊर्जेची जाणीव करून देणारा जंगलचा राजा हे चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे राहते. समृद्ध करणारा हा अनुभव डोळ्यात साठवून घेण्यासाठी पर्यटक मोठय़ा प्रमाणावर वेळ आणि पैसा खर्च करतात. ज्यांना हा आनंद अनुभवता येतो ते भरून पावतात, नाही ते वाघाच्या दंतकथांचेच पारायण करतात. दिवस सरतात, जंगल्यातल्या युद्धात वाघ जखमी होतो. शिकारीसाठी धडपड सुरू असते मात्र शरीर जायबंदी असतं. सहज टिपता येणाऱ्या प्राण्यांना गाठणंही कठीण होऊ लागतं. अंगात रग असूनही शिकार हुकल्याचं दु:ख वाघाच्या डोळ्यात तरळतं. पण या वाघाच्या दर्शनाला कोणी नसतं. तो एकाकी होतो. टेनिसविश्वातल्या राफेल नदालरुपी वाघाचं असंच झालं आहे.
२ जुलैची संध्याकाळ- ऑल इंग्लंड टेनिस क्लब अर्थात विम्बल्डन प्रांगणात, पत्रकार परिषदेसाठीच्या सभागृहात प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी प्रतीक्षा करत होते. काही मिनिटांपूर्वीच जर्मनीच्या डस्टिन ब्राऊनने नदालला चीतपट केले होते. पल्लेदार टांगा टाकत, आंघोळीनंतरचे ओले केस कुरवाळत नदाल दमदार एंट्री घेईल अशी अपेक्षा होती. पण घडलं भलतंच.. पत्रकार परिषद हा औपचारिकतेचा भाग म्हणून आलेला खिन्न, म्लान आणि डोळ्यातच पराभव सांडलेला नदाल आल्याचं चटकन कळलंही नाही. आपण हरलोय आणि तेही सर्वोत्तम खेळ न करता हे मांडणं त्याला फारच जड गेलं. डस्टिन ब्राऊनचं त्याने खुल्या दिलाने कौतुक केलं पण स्वत:पुढच्या अंधारलेल्या भविष्याची वाट त्या हुरहुर लावणाऱ्या संध्याकाळी अधोरेखित होत गेली. दहा मिनिटांत बोलण्याचे सोपस्कार आटोपून तो परतला.. एखाद्या पातकाचं दु:ख अंगावर बाळगत.
२००० च्या दशकात रॉजर फेडरर, राफेल नदाल आणि नोव्हाक जोकोव्हिच यांनी ठरवून घेतल्याप्रमाणे ग्रँडस्लॅम जेतेपदं मिळत असत. आता या फ्रेममधून नदाल वजा झाला आहे. या त्रिकुटाला भेदण्याचं मर्म आता कुठे अँडी मरे, स्टॅनिसलॉस वॉवरिन्का, मारिन चिलीच यांना गवसलं आहे. जोकोव्हिचपेक्षा नदाल फक्त एका वर्षांने मोठा आहे तर फेडरर ३३ वर्षांचा आहे. आधुनिक टेनिसच्या शिलेदार असे वर्णन होणारे आपले समकालीन प्रतिद्वंद्वी प्रत्येक ग्रँडस्लॅम स्पर्धेत किमान उपांत्य फेरी गाठत असताना आपल्याला प्राथमिक फेरीतूनच गाशा गुंडाळावा लागणं नदालसाठी अधिक यातना देणारं आहे. यंदा विम्बल्डनमध्ये फेडरर आणि जोकोव्हिच यांच्यात जेतेपदासाठी मुकाबला रंगणार आहे आणि नदाल पहिल्याच दिवशी माघारी परतला आहे. मात्र या अपयशाचं कारण नदालच्या कौशल्यापेक्षा जायबंदी शरीरात आहे. कारकीर्दीत अगदी सुरुवातीला म्हणजे २००४ मध्ये नदालच्या पायाच्या घोटय़ाला दुखापत झाली होती. परंतु ही दुखापत गंभीर नव्हती. पुढच्याच वर्षी त्याचा पाय दुखावला. मात्र आठवडय़ाभराच्या विश्रांतीनंतर तो परतला. तीन वर्ष अथक खेळल्यानंतर नदालला गुडघ्यांमध्ये त्रास जाणवू लागला. हीच दुखापत नदालच्या घसरणीचे मूलभूत कारण. गुडघ्याच्या स्नायूंमध्ये होणारी असह्य वेदना हे नदालच्या आजाराचे लक्षण. मुळातच टेनिस म्हणजे पाय, गुडघे, पोटऱ्या, खांदे, मनगटं यांची सत्वपरीक्षा पाहणारा खेळ. संपूर्ण वर्षभर पसरलेले भरगच्च वेळापत्रक तसेच प्रवास आणि प्रायोजकांच्या अलिखित दडपणामुळे सतत जिंकण्याचं, क्रमवारीत अव्वल दहामध्ये राहण्याचं दडपण. या चक्राचा नदाल गेली पंधरा वर्ष अविभाज्य भाग आहे. पैसा, प्रसिद्धी आणि चाहत्यांचं अमाप प्रेम देणाऱ्या या गतिमान चक्रानेच नदालच्या गुडघ्यांना पोखरलं. कारकीर्दीत तीनवेळा गुडघ्यांनी नदालचा विजयरथ रोखला. लेझर उपचारांमुळे त्याला पुन्हा खेळायची संजीवनी मिळाली पण शरीर कमकुवत झालं ते कायमचंच. गेल्यावर्षी त्याचं अपेंडिक्स काढून टाकण्यात आलं. यातून सावरतोय तोच पाठीच्या दुखण्याने उचल खाल्ली. टेनिसपटूंना होणाऱ्या सर्वाधिक दुखापती पाठीसंदर्भात असतात. एक तपाहून जास्त काळ नदालचे डॉक्टर म्हणून सेवेत असणाऱ्या अँजेल रुईझ कोटेरो यांनी या दुखण्यासाठी स्टेम सेलचा पर्याय निवडला. हे उपचार आजही सुरू आहेत. यादरम्यान मांडीचे स्नायू आणि मनगटाच्या दुखापतींनी नदालला सतवलं. या सगळ्याचा परिपाक म्हणजे गेल्या दहा वर्षांत खेळलेले सामने आणि दुखापतीमुळे माघार घ्यावी लागलेले सामने यांचं पारड समसमान होण्याच्या मार्गावर आहे. शारीरिक वेदनांइतकंच दुखापती मानसिक खच्चीकरण करतात. अन्य खेळाडू, स्पर्धा पुढे निघून जातात. त्यांना गाठण्याची ताकद नदालकडे आहे. परंतु यंदा फ्रेंच ओपन अर्थात लाल मातीवरच्या पराभवामुळे तिशी गाठण्याआधीच नदाल कारकीर्दीच्या उत्तरार्धात आल्याचे जाणवते आहे. अफाट ताकद, शेवटच्या गुणापर्यंत झुंजण्याची वृत्ती, कोणत्याही क्षणापासून पुनरागमन करण्याची क्षमता, सर्व प्रकारच्या फटक्यांवर असलेले प्रभुत्त्व या गुणवैशिष्टय़ांसह नदालने १४ ग्रँडस्लॅम जेतेपदांवर नाव कोरले आहे. जागतिक क्रमवारीत शंभरात नसणाऱ्या खेळाडूंनी विम्बल्डन स्पर्धेत सातत्याने नदालला पराभूत केले आहे. नवख्या खेळाडूने हरवलं यापेक्षाही संघर्ष न करता येण्याचं दु:ख तीव्र आहे हे नदालची देहबोली सांगते आहे. ५० टक्के तंदुरुस्त नदालला नमवणंही कठीण असल्याचं त्याचे प्रतिस्पर्धी सांगतात. पण आता बहुधा इतके टक्के मिळवणंही त्याला दुरापास्त झालं आहे. सततच्या पराभवावर उपाय म्हणून नदालला प्रशिक्षक बदलण्याचा सल्ला ज्येष्ठ टेनिसपटू जॉन मॅकेन्रो यांनी दिला आहे. काका टोनी नदाल यांना डच्चू देऊन नदाल हा सल्ला मानेलही परंतु कोर्टवर त्याला खेळायचं आहे. प्रतिस्पर्धी खेळाडूंचं भय त्याला कधीच नसतं पण सामन्यागणिक डोकं वर काढणाऱ्या नवनवीन दुखापती त्याचे शत्रू आहेत. जिंकण्यासाठी जीवाचं रान करणाऱ्या नदालला या शत्रूनेच अकाली वृद्ध केलं आहे. जेतेपद त्याला खुणावतंय, दुखापतींना टक्कर देत तो सहभागीही होतो पण अल्पावधीतच तो स्पर्धेबाहेर असतो. या सगळ्याला कंटाळून नदालरुपी वाघाने टेनिस सोडलं तर ते खेळाचे मोठं नुकसान असेल.
parag.phatak@expressindia.com