आधुनिक टेनिसचे शिलेदार रॉजर फेडरर आणि राफेल नदाल इंटरनॅशनल प्रीमिअर टेनिस लीगच्या (आयपीटीएल) निमित्ताने आमनेसामने उभे ठाकणार आहेत. गेल्या वर्षी झालेल्या पहिल्या हंगामात टेनिसचाहत्यांना फेडरर आणि जोकोव्हिच द्वंद्वाची झलक अनुभवायला मिळाली होती, परंतु नदाल दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता. यंदा ही कसर भरून निघणार आहे.
नदाल इंडियन एसेस संघाचा भाग असल्याने भारतीय टेनिस चाहत्यांना ‘याचि देही, याचि डोळा’ त्याला खेळताना पाहता येणार आहे. गेल्या वर्षी इंडियन एसेस संघाचा भाग असलेल्या रॉजर फेडररला पाहण्यासाठी टेनिसचाहत्यांनी अमाप प्रतिसाद दिला होता. यंदा फेडरर यूएई रॉयल्स संघाकडून खेळणार आहे. यूएई रॉयल्स आणि इंडियन एसेस संघातील लढतीचा भाग म्हणून फेडरर-नदाल ग्रॅण्ड स्लॅम मुकाबल्याची झलक पाहता येणार आहे.
आयपीटीएलचा दुसरा हंगाम डिसेंबरमध्ये रंगणार असून, १० ते १२ डिसेंबर या कालावधीत नवी दिल्लीत भारतीय टप्प्याचे सामने होणार आहेत. भूपती-पेस जोडीमधील वादाने टेनिस क्षेत्राची प्रतिमा मलिन झाली होती. मात्र सगळे वाद बाजूला ठेवत पेस दुसऱ्या हंगामात खेळणार आहे. तो जपान वॉरियर्सचे प्रतिनिधित्व करणार आहे.