कोएफरविरुद्ध साडेतीन तासांच्या संघर्षपूर्ण झुंजीनंतर विजय

तंदुरुस्तीसाठी विश्रांतीला प्राधान्य

एपी, पॅरिस

कारकीर्दीतील अखेरच्या टप्प्यावर असलेला २० ग्रँडस्लॅम विजेता टेनिसपटू रॉजर फेडररला शनिवारी मध्यरात्री फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत उपउपांत्यपूर्व फेरीतील स्थान पक्के करण्यासाठी संघर्ष करावा लागला. मात्र शारीरिक तंदुरुस्ती आणि गुडघ्यावर येणारा ताण या कारणास्तव ३९ वर्षीय फेडररने विश्रांतीला प्राधान्य देत स्पर्धेतून माघार घेण्याचे ठरवल्यामुळे त्याच्या चाहत्यांचा हिरमोड झाला.

फ्रेंच स्पर्धेच्या संयोजकांनी रविवारी सायंकाळी ‘ट्विटर’वर फेडररच्या माघारीचा निर्णय जाहीर केला. पुरुष एकेरीच्या तिसऱ्या फेरीच्या लढतीत फेडररने जर्मनीच्या डॉमिनिक कोएफरला ७-६ (७-५), ६-७ (३-७), ७-६ (७-४), ७-५ असे चार सेटमध्ये पराभूत केले आणि उपउपांत्यपूर्व फे री गाठली. हा सामना तीन तास आणि ३५ मिनिटे रंगला. या लढतीत तब्बल तीन सेट टायब्रेकपर्यंत पोहोचल्यामुळे फेडररची प्रचंड दमछाक झाली. त्यामुळे सोमवारी उपउपांत्यपूर्व फेरीत इटलीच्या मॅटिओ बॅरेट्टिनीविरुद्धच्या लढतीत खेळावे की नाही, याविषयी फेडरर रविवारी निर्णय घेण्याचे अपेक्षित होते. अखेर त्याने माघार घेतल्यामुळे बॅरेट्टिनीचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला.

जागतिक क्रमवारीत सध्या आठव्या स्थानी असलेला स्वित्र्झलडचा फेडरर ऑगस्ट महिन्यात वयाची चाळिशी गाठेल. ‘‘फ्रेंच स्पर्धा जिंकण्याची मला मुळीच संधी नाही, याची कल्पना आहे. परंतु विम्बल्डनपूर्वी पुन्हा लय मिळवावी आणि अधिकाधिक ग्रँडस्लॅम स्पर्धामध्ये खेळण्याचा आनंद मिळावा, यासाठी मी या स्पर्धेत सहभागी होत आहे,’’ असे विधान फेडररने फ्रेंच स्पर्धेला प्रारंभ होण्यापूर्वीच व्यक्त केले होते. गेल्या वर्षी गुडघ्यावर झालेल्या शस्त्रक्रियेपासून फेडरर ठराविक स्पर्धानाच प्राधान्य देण्याचे धोरण जपतो. २८ जूनपासून सुरू होणाऱ्या विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेपूर्वी फेडरर आणखी एका हिरवळीवरील स्पर्धेत खेळण्याच्या विचारात आहे.

फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा

सेरेनाचेही आव्हान संपुष्टात

सेरेना विल्यम्सचा २४व्या ग्रँडस्लॅम जेतेपदाचा शोध अद्यापही कायम आहे. रविवारी ३९ वर्षीय सेरेनाला महिला एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. रशियाच्या २१व्या मानांकित एलिना रिबॅकिनाने सातव्या मानांकित सेरेनावर ६-३, ७-५ असे सहज वर्चस्व गाजवले. २०१७पासून सेरेनाने एकाही ग्रँडस्लॅम स्पर्धेचे विजेतेपद मिळवलेले नाही. त्यामुळे पुरुष एकेरीत एकीकडे फेडरर, तर महिलांमध्ये सेरेनाची कारकीर्दही जवळपास अंतिम टप्प्यावर पोहोचल्याचे दिसत आहे. सेरेनाव्यतिरिक्त, व्हिक्टोरिया अझारेंका आणि मार्केता वोंद्रोशोव्हा यांचेही आव्हान संपुष्टात आले. ३१व्या मानांकित अनास्तासिया पावल्यूचेन्कोव्हाने १५व्या मानांकित अझारेंकाला ५-७, ६-३, ६-२ असे नमवून तब्बल १० वर्षांनी प्रथमच उपांत्यपूर्व फेरी गाठली. यापूर्वी २०११मध्ये तिला उपांत्यपूर्व फेरीत पराभव पत्करावा लागला होता. तिची पुढील फेरीत रिबॅकिनाशी गाठ पडेल. पॉला बॅडोसाने २०व्या मानांकित वोंद्रोशोव्हाला ६-४, ३-६, ६-२ असे पराभूत केले. टामरा झिदानसेकने सोरोना क्रिस्टियावर ७-६ (७-४), ६-१ अशी मात केली.

त्सित्सिपासची आगेकूच : रशियाचा डॅनिल मेदवेदेव आणि ग्रीकचा स्टीफानोस त्सित्सिपास यांनी रविवारी फ्रेंच टेनिस स्पर्धेत दमदार विजयाची नोंद केली. आता मंगळावारी होणाऱ्या उपांत्यपूर्व लढतीत दोघेही एकमेकांविरुद्ध उभे ठाकतील. दुसऱ्या मानांकित मेदवेदेवने चिलीच्या २२व्या मानांकित ख्रिस्तियन गॅरिनला ६-२, ६-१, ७-५ असे सरळ तीन सेटमध्ये नमवले. पाचव्या मानांकित त्सित्सिपासने स्पेनच्या १२व्या मानांकित पाब्लो कॅरेनो बुस्टावर ६-३, ६-२, ७-५ असे वर्चस्व गाजवले.

बोपण्णा उपांत्यपूर्व फेरीत

भारताचा रोहन बोपण्णा आणि त्याचा क्रोएशियन सहकारी फ्रँको स्कूगोरने पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीतील स्थान पक्के केले. नेदरलँड्सचा मॅथ्यू मिडलकूपच्या पायाला दुखापत झाल्यामुळे मार्सेलो अव्‍‌र्हेलोच्या साथीने खेळणाऱ्या या जोडीने उपउपांत्यपूर्व सामन्यासाठी कोर्टवर न उतरण्याचे ठरवले. त्यामुळे बोपण्णा-स्कूगोरला पुढे चाल देण्यात आली.

गुडघ्यावर झालेल्या दोन शस्त्रक्रियांमुळे आरोग्याला माझे नेहमीच पहिले प्राधान्य असेल. गुडघ्यावर अतिरिक्त दडपण आणून मला कोणत्याही दुखापतीला आमंत्रण द्यायचे नाही. त्यामुळे मी फ्रेंच टेनिस स्पर्धेतून माघार घेत आहे. जवळपास दीड वर्षांने ग्रँडस्लॅम स्पर्धेत खेळतानादेखील तीन सामने जिंकल्यामुळे मी फार समाधानी आहे. आता विम्बल्डनसाठी मी अधिक जोमाने तयारी करू शकेन. – रॉजर फेडरर