तीन वर्षांचा ग्रँड स्लॅम स्पध्रेतील जेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी रॉजर फेडररला अमेरिकन खुल्या टेनिस स्पध्रेच्या अंतिम लढतीत कट्टर प्रतिस्पर्धी नोव्हाक जोकोव्हिचचा सामना करावा लागणार आहे. अंतिम फेरीत ३४ वर्षीय फेडररने बाजी मारल्यास १९७०नंतर अमेरिकन खुल्या स्पध्रेचे जेतेपद पटकावणारा तो सर्वात वयस्कर खेळाडू ठरेल.

स्वित्र्झलडच्या फेडररने सहा वर्षांनंतर अमेरिकन खुल्या स्पध्रेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. पाच वेळा या स्पध्रेचे जेतेपद जिंकणाऱ्या फेडररने उपांत्य फेरीत आपल्याच देशाच्या स्टॅनिसलास वॉवरिंकाचा ६-४, ६-३, ६-१ असा पराभव केला. २०११च्या विजेत्या जोकोव्हिचने उपांत्य फेरीत गतविजेत्या मारिन चिलीचवर ६-०, ६-१, ६-२ असा विजय मिळवून सहाव्यांदा अमेरिकन खुल्या स्पध्रेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. हे दोघेही ४२व्यांदा एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. याआधी झालेल्या लढतीत फेडररने २१वेळा बाजी मारली आहे.
१७ ग्रँड स्लॅम नावावर असलेल्या फेडररने २०१२मध्ये विम्बल्डन स्पध्रेचे जेतेपद पटकावत अखेरचे ग्रँड स्लॅम नावावर केले होते. उपांत्य फेरीतही फेडररने एकही सेट न गमावता सलग २८ सेट जिंकण्याची किमया साधली. ‘‘मी खूप खूश आहे. आतापर्यंत स्पध्रेतील प्रवास सुखकारक आहे. गेली सहा वष्रे या स्पध्रेच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी कठोर परिश्रम घेत आहे आणि आज ते शक्य झाले,’’ अशी प्रतिक्रिया फेडररने दिली. याआधी २००५च्या अमेरिकन खुल्या स्पध्रेत ३५ वर्षीय आंद्रे आगासीने बाजी मारली होती. यंदाच्या वर्षांत सहा वेळा फेडरर आणि जोकोव्हिच हे अंतिम फेरीत समोरासमोर आले आहेत. ‘‘हे वर्ष नोव्हाकसाठी सर्वोत्तम ठरले आहे. त्याला हरवणे कठीण आहे, परंतु या आव्हानासाठी मी सज्ज आहे,’’ असे फेडरर म्हणाला.
दुसऱ्या उपांत्य फेरीत जोकोव्हिचने चिलीचचे आव्हान सहज परतवले. चालू वर्षांतील चारही ग्रँड स्लॅमच्या अंतिम फेरीत जोकोव्हिचने प्रवेश केला असून ऑस्ट्रेलियन खुली स्पर्धा आणि विम्बल्डनचे जेतेपद पटकावण्यात त्याला यश आले.
‘‘मारिनला गेल्या काही दिवसांपासून पायाच्या घोटय़ाची दुखापत सतावत होती आणि अशाही परिस्थितीत त्याने सामना पूर्ण करण्याचे धाडस दाखविले. चालू वर्षांत चारही ग्रँड स्लॅमच्या अंतिम फेरीत धडक मारण्याचे यश मोठे आहे. याच वेळी तुम्हाला सर्वोत्तम खेळ करावा लागतो,’’ असे जोकोव्हिच म्हणाला.