उपांत्य फेरीत स्टान वॉवरिंकाचे आव्हान
अमेरिकन खुल्या टेनिस स्पध्रेत ३४ वर्षीय रॉजर फेडररची घोडदौड एक्स्प्रेस वेगाने सुसाटपणे उपांत्य फेरीत धडकली आहे. पाच वेळा अमेरिकन खुल्या टेनिस स्पध्रेचे जेतेपद पटकावणाऱ्या फेडररसमोर उपांत्य फेरीत स्टान वॉवरिंकाचे आव्हान आहे. सरावातील सातत्य आणि व्यायामाने स्वत:ला तंदुरुस्त राखत फेडररने या स्पध्रेत दहाव्यांदा उपांत्य फेरीत प्रवेश केला. वॉवरिंका आणि फेडरर २०व्यांदा एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.
उपांत्यपूर्व फेरीत फेडररने ८७ मिनिटांत रिचर्ड गॅस्क्वेटचा ६-३, ६-३, ६-१ असा पराभव केला. या विजयाबरोबर फेडरर स्पध्रेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला. फेडररने रिचर्डवर वर्चस्व गाजवले. गेल्या १७ सामन्यांतील फेडररचा रिचर्डवरील हा १५वा विजय आहे. या लढतीनंतर आपण १० तास झोपणार असल्याचे फेडररने सांगितले. तो म्हणाला, ‘‘उपांत्य फेरीच्या लढतीपूर्वी पुरेशी झोप आवश्यक आहे. चौथ्या फेरीत जॉन इस्नरविरुद्धच्या लढतीला खूप उशीर झाला होता आणि त्यामुळे पुरेशी झोप झाली नव्हती.’’
उपांत्य फेरीत फेडररसमोर जवळचा मित्र स्टान वॉवरिंकाचे आव्हान आहे. वॉवरिंकाने उपांत्यपूर्व फेरीत दक्षिण आफ्रिकेच्या केव्हिन अँडरसनवर ६-४, ६-४, ६-० असा विजय साजरा केला. या लढतीतील विजेत्याला अंतिम फेरीत नोव्हाक जोकोविच आणि गतविजेत्या मारिन चिलिच यांच्यातील विजेत्याशी सामना करावा लागेल. वॉवरिंकाने २०१४मध्ये ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पध्रेचे जेतेपद पटकावले होते आणि यंदा ग्रॅण्डस्लॅमचा दुष्काळ नाहीसा करण्यासाठी फेडररसारखा तोही प्रयत्नशील असेल.
‘‘उपांत्य फेरीत कोर्टवर येताच आम्ही दोघेही चिंताग्रस्त असू, परंतु त्याआधीपासूनच मी चिंतित आहे. कारण, फेडररच्या स्तरावरील खेळ मला करता येणार नाही, याची जाण आहे,’’ असे वॉवरिंका म्हणाला.