कोणत्याही संघातील फलंदाजीमध्ये तिसरे स्थान फार महत्त्वाचे असते. काही वर्षांपूर्वी ‘द वॉल’ ही बिरुदावली मिरवणाऱ्या राहुल द्रविडने तिसऱ्या स्थानावर येऊन दर्जेदार फलंदाजी करीत बऱ्याच वेळा भारताला सावरले आहे. त्यामुळे त्याच्या निवृत्तीनंतर ही जागा कोण सांभाळणार, हा प्रश्न साऱ्या क्रिकेट जगताला पडला होता. त्या वेळी युवा खेळाडू चेतेश्वर पुजाराने हे स्थान काही सामन्यांमध्ये आपलेसे केले आहे. या दोघांची सध्या तुलना करणे योग्य नसले तरी या तुलनेने आपल्याला मानसिक बळ मिळते, असे मत पुजाराने व्यक्त केले आहे. द्रविडबरोबर माझी तुलना करणे, ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. द्रविडला क्रिकेट विश्व ‘द वॉल’ या नावाने ओळखायचे आणि त्याची कामगिरीही दर्जेदार व्हायची. त्यामुळे भारताचा यशस्वी फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे जेव्हा त्याची तुलना माझ्याबरोबर करण्यात येते, तेव्हा मी सुखावतो. या तुलनेने माझे मानसिक बळ वाढते, असे पुजारा म्हणाला.