दडपणाची स्थिती अतिशय शांतपणे हाताळणारा म्हणून भारताचा विश्वचषक विजेता माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याची ओळख आहे. मात्र अन्य खेळाडूंप्रमाणे दडपण आणि भीती त्यालाही जाणवते, अशी कबुली खुद्द धोनीने दिली आहे.

‘‘भारतात अजूनही मानसिक दडपणासंबंधीचे विषय हे गंभीरपणे घेतले जातात. मानसिक दडपण म्हणजे बिघडलेले मानसिक स्वास्थ्य यादृष्टीने पाहिले जाते. मी फलंदाजी करतो तेव्हा सुरुवातीच्या ५ ते १० चेंडूंना सामोरे जाताना माझे हृदयाचे ठोके वाढलेले असतात. मला सुरुवातीला नेहमीच दडपण जाणवते. थोडीफार भीतीही वाटत असते. या सर्वाला कसे सामोरे जायचे, याचा मार्ग शोधणे गरजेचे आहे,’’ असे धोनीने म्हटले.

‘‘वास्तविक सुरुवातीच्या चेंडूंना फलंदाज म्हणून सामोरे जाताना दडपण वाटणे स्वाभाविक आहे. मात्र याविषयी अनेक जण प्रशिक्षकांशी चर्चा करत नाहीत. या सर्वामुळे प्रशिक्षक आणि खेळाडू यांच्यातील नाते कोणत्याही खेळात फार महत्त्वाचे असते,’’ असे धोनीने सांगितले. ‘‘मानसोपचारतज्ज्ञ जर सातत्याने खेळाडूंसोबत असेल तर ते खूप चांगले असते. मानसोपचारतज्ज्ञ खेळाडूंमधील उणिवा बरोबर शोधून काढतात,’’ असे धोनीने सांगितले. गेल्या वर्षी जुलैनंतर धोनी एकही आंतरराष्ट्रीय लढत खेळलेला नाही.

भारताचा कर्णधार विराट कोहली यानेही मानसिक सामर्थ्यांविषयी प्रतिक्रिया दिली आहे. ‘‘मानसिकदृष्टय़ी तंदुरुस्त असणे सध्या अत्यावश्यक आहे. फक्त खेळाच्याच बाबतीत नाही तर दैनंदिन आयुष्याच्या दृष्टीनेही मानसिकदृष्टय़ा कणखर असण्याची आवश्यकता आहे,’’ असे कोहली म्हणाला.