इशांत शर्मा भारतीय कसोटी संघाचा प्रमुख गोलंदाज म्हणून ओळखला जातो. परंतू गेली काही वर्ष इशांतला भारतीय वन-डे संघात आपलं स्थान मिळवता आलेलं नाही. २०१३ साली ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्यादरम्यान जेम्स फॉकनरने मोहाली वन-डे सामन्यात इशांतच्या एका षटकात ३० धावा चोपल्या. ESPNCricinfo च्या एका कार्यक्रमात बोलत असताना इशांतने हा प्रसंग आपल्या आयुष्याला कलाटणी देणारा प्रसंग ठरल्याचं सांगितलं.

“२०१३ साली मोहाली वन-डे सामन्यात फॉकनरने माझ्या एका षटकात ३० धावा चोपल्या आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाने तो सामनाही जिंकला. त्या क्षणी मी माझ्या देशाला फसवतोय असं वाटत होतं. पुढील २-३ आठवडे मी कोणाशीही बोलत नव्हतो. मी प्रचंड रडलो. तसा मी खूप खंबीर असतो. माझी आई मला नेहमी म्हणते की तुझ्यासारखा खंबीर मुलगा मी कुठे पाहिला नाही. पण त्यावेळी मी माझ्या गर्लफ्रेंडला फोन केला आणि एखाद्या लहान मुलासारखा रडलो. ते दोन-तीन आठवडे माझ्यासाठी खूप भयानक होते. मी धड जेवत नव्हतो, मला झोप लागत नव्हती. टीव्ही लावला तर सातत्याने तुमच्या कामगिरीवर टीका होतानाच्या बातम्या दिसायच्या, ज्यामुळे अधिक निराशा यायची.” इशांत आपल्या खडतर काळाबद्दल बोलत होता.

पण यानंतर माझ्यात खूप बदल झाला. मी प्रत्येक गोष्टीकडे गांभीर्याने पहायला शिकलो. याआधी माझ्याकडून एखाद्या सामन्यात खराब कामगिरी झाली आणि त्याबद्दल मला कोणी सांगायला आलं तर मी त्यांना, ठीक आहे…असं होतं कधीतरी ! असं म्हणायचो. मात्र फॉकनरच्या प्रसंगानंतर मी माझ्यात बदल घडवायचा ठरवलं. माझ्याकडून झालेल्या प्रत्येक चुकीची जबाबदारी मी घ्यायचं ठरवलं आणि स्वतःची कामगिरी सुधारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर माझ्या कामगिरीत बदल घडल्याचं इशांतने सांगितलं. आजही वन-डे, टी-२० संघासाठी इशांतचा विचार केला जात नसला तरीही कसोटी संघासाठी तो भारताचा प्रमुख गोलंदाज आहे.