संसाराच्या जबाबदाऱ्या पार पाडत पोलीस दलातली सतर्कतेची नोकरीही करतानाच खेळातील आव्हाने लीलया पेलणाऱ्या वीरांगना म्हणजे मुंबई पोलिसांचा महिला कबड्डी संघ. स्थानिक महिला गटात मुंबई पोलीस जिमखाना तर व्यावसायिक महिला गटात मुंबई पोलीस या नावाने खेळणाऱ्या या संघातील १२ खेळाडूंपैकी सात जणी विवाहित आहेत. शिवनेरी स्पध्रेतील उपविजेतेपदानिशी यंदाच्या हंगामाला प्रारंभ करणाऱ्या या संघाने नुकतीच मुंबई शहर जिल्हा अजिंक्यपद स्पध्रेत जेतेपदाला गवसणी घातली आहे. त्यामुळे या संघाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या यशाबाबत संघाचे प्रशिक्षक विठ्ठल साळुंखे म्हणाले की, ‘‘१५ ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकीचे मतदान झाले आणि १९ तारखेला मतमोजणी. या दोन्ही दिवशी आमच्या मुलींनी बंदोबस्ताची चोख भूमिका बजावली. तर १६ ते १८ ऑक्टोबर दरम्यान वडाळ्याला जिल्हा अजिंक्यपदाचे सामने खेळून विजेतेपदावर मोहोरही उमटवली. मागील हंगामात आम्ही सात स्पर्धा जिंकल्या होत्या.’’
ते पुढे म्हणाले, ‘‘आमचा संघ आधी वीर जिजामाता या नावाने ओळखला जायचा. परंतु गेली दोन वष्रे आम्ही मुंबई पोलीस या नावाने खेळतो आहोत. सकाळी तंदुरुस्तीशी निगडित व्यायाम आणि दुपारच्या सत्रात कबड्डीचा सराव या मुली करतात. कबड्डीमधून मिळणाऱ्या ऊर्जेमुळे त्या विशेष बंदोबस्त, घरची आव्हाने या सर्व आघाडय़ांवर आत्मविश्वासाने सामना करतात.’’
या संघातील खेळाडू सोनल धुमाळ आपला दिनक्रम मांडताना म्हणाली की, ‘‘सकाळी सातच्या आत मैदानावर पोहोचावे लागते. परंतु माझी सासू शिकवण्यांचे वर्ग सांभाळून माझ्या पाठीशी समर्थपणे असते. त्यामुळे सकाळच्या वेळी मला घरची चिंता बाळगावी लागत नाही. दुपारी घरी जाते तेव्हा मात्र मी घरातली कामे करते आणि सायंकाळी सराव संपल्यावर घरी परतल्यावर स्वयंपाकही करते.’’
पतीसुद्धा कबड्डीपटू असल्यामुळे भक्ती इंदुलकरच्या कुटुंबीयांना खेळ आणि खेळाडूपुढील आव्हाने माहीत आहेत. त्यामुळे तिच्या मार्गात घरून कधीच आडकाठी आली नाही. आरती नार्वेकरचे पतीसुद्धा कबड्डीपटू. त्यामुळे तिच्या घरातील वातावरण तसे कबड्डीमयच. सहा वेळा मुंबई शहराचे आणि २०११मध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारी आरतीसुद्धा सासू-सासऱ्यांच्या पाठिंब्याच्या बळावर खेळातील कारकिर्दीकडे गांभीर्याने पाहते आहे.
प्रमोदिनी चव्हाण, आरती नार्वेकर, शीतल बावडेकर, सोनल धुमाळ, भक्ती इंदुलकर, कल्याणी विचारे या कबड्डीपटूंची विद्यापीठ किंवा राष्ट्रीय पातळीवर निवडसुद्धा झाली आहे. या संघाचे सहाय्यक प्रशिक्षक एकनाथ सणस म्हणाले, ‘‘पोलीस खात्यात क्रीडापटू म्हणून या मुली कार्यरत असल्यामुळे त्यांना आहार भत्ता मिळतो, तर शैलेश शेलार तंदुरुस्तीकडे लक्ष देतात. याशिवाय खेळात कर्तृत्व दाखवल्यास त्यांना बढतीसुद्धा मिळते.’’