कुस्तीपटू कौशल्या वाघचे स्वप्न

रिओ ऑलिम्पिकमध्ये साक्षी मलिकने कांस्यपदक पटकावले. हा पराक्रम करणारी ती पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली. त्यानंतर भारतात मुलींच्या कुस्ती खेळण्यात वृद्धी व्हायला लागली, असे म्हटले जाते. पण पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रातील महिला कुस्तीची परिस्थिती ‘जैसे थे’ आहेच. अजूनही ‘महाराष्ट्र केसरी’ विजेत्या मल्लाला जेवढा मान दिला जातो, तेवढा आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक मिळालेल्या महिला कुस्तीपटूला मिळत नाही. मुलींसाठी कुस्तीसाठी पायाभूत सुविधा नाहीत. त्यांच्यासाठी खास आखाडे नाहीत की जिथे महिला प्रशिक्षक असतील. स्वत: या खाचखळग्यातून आलेल्या आंतरराष्ट्रीय महिला कुस्तीपटू कौशल्या वाघने ही परिस्थिती बदलण्याचे शिवधनुष्य उचलले आहे. महाराष्ट्रात खास मुलींचा आखाडा उभारण्याचे स्वप्न तिने उराशी बाळगले आहे. सारी सोंगे आणता येतात, पण पैशाचे नाही. आंतरराष्ट्रीय पदक पटकावल्यावरही कौशल्याला शासकीय नोकरी मिळालेली नाही. त्यामुळे या आखाडय़ाच्या स्वप्नांना लागणाऱ्या २५-३० लाखांच्या आर्थिक पाठबळीचे पंख मिळावेत, अशी आशा कौशल्या करत आहे.

‘‘माझे वडील शेतकरी होते. त्याचबरोबर हमालाचे कामही करायचे. पण त्यांना कुस्तीचा मोठी आवड. त्यामुळे त्यांनी घरच्यांसाठी कुस्तीचा आखाडा बनवला होता. माझे भाऊ त्या आखाडय़ात उतरायचे. मला मात्र समाज काय म्हणेल, म्हणून सुरुवातीला विरोध झाला. पण घरच्यांनी पाठिंबा दिला. भावांबरोबर सराव करत असल्यामुळे तंदुरुस्ती वाढली. त्यामुळे आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्पर्धामध्ये पदक पटकावता आले. पण तरीही सध्याच्या घडीला मुलींच्या कुस्तीची महाराष्ट्रात भीषण अवस्था आहे. मुलींना कुस्ती खेळायची आहे, पण सुविधा नाही. अशा गुणवान मुलींसाठी मला विशेष आखाडा सुरु करायचा आहे. त्यासाठी आर्थिक अडचण दूर झाली, तर हे स्वप्न साकार करता येईल,’’ असे कौशल्या सांगत होती.

अंधेरीमध्ये २००५ साली कौशल्याने एका मल्लासोबत कुस्तीची लढत जिंकली आणि त्यानंतर ती प्रकाशझोतात आली. महाराष्ट्राला २००६ साली आशियाई स्पर्धेत पहिले पदक जिंकवून देणारी कौशल्या पहिलीच. त्याचबरोबर राष्ट्रीय स्पर्धेतही सुवर्णपदक पटकावले. दुखापतींमुळे तिला खेळात मोठी मजल मारता आली नाही. तिच्यावर आतापर्यंत पाच शस्त्रक्रीया झाल्या आहेत. डाव्या गुडघ्यावर तीनदा शस्त्रक्रिया झाली आहे. त्यामुळे आता पुन्हा दुखापत झाली तर गुडघा बदलावा लागू शकतो. त्यामुळे तिला यापुढे आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळता येणे जोखमीचे आहे. त्यामुळे तिने मुलींच्या आखाडय़ाचे स्वप्न पाहिले आहे.

‘‘आता आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणे माझ्यासाठी जोखमीचे आहे. मला खेळता आले नाही, तरी जर माझी शिष्या ऑलिम्पिकमध्ये खेळली आणि जिंकली तर माझे आयुष्य सार्थकी लागेल. त्यासाठी हा सारा खटाटोप मी करत आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर संघटना माझ्या पाठिशी आहे. सरकारलाही मी मदतीचे आवाहन केले आहे. पण त्यांच्याकडून पुरेशी मदत मिळेल असे वाटत नाही. हरयाणामध्ये एका आखाडय़ात आठ प्रशिक्षक असतात, पण आपल्याकडे एकच असतो. हे चित्र मला बदलायचे आहे,’’ असे कौशल्या म्हणाली.

आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पदकानंतरही शासकीय नोकरीपासून वंचित

कौशल्याने २००६ साली आशियाई स्पर्धेमध्ये रौप्यपदकाची कमाई केली होती. भारताकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक पटकावणारी ती पहिली कुस्तीपटू होती. त्यानंतर केरळमध्ये २०१३-१४ साली झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत कौशल्याने सुवर्णपदक पटकावले होते. पण अजूनही ती शासकीय नोकरीच्या प्रतिक्षेत आहे. ‘‘जर मला शासकीय नोकरी मिळू शकली तर माझ्यावरचा आर्थिक भार कमी होईल. आता माझ्या उदारनिर्वाहापेक्षा मला मुलींच्या आखाडय़ाचा प्रश्न महत्वाचा वाटतो,’’ असे कौशल्य म्हणाली.