अहमदाबाद येथे सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघाची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. इंग्लंडचा कर्णधार जो रुट आणि फिरकीपटू जॅक लीच या फिरकी जोडीपुढे ‘टीम इंडिया’च्या दिग्गजांनी गुडघे टेकले. लीच-रुट जोडीने तब्बल ९ गडी बाद करत भारतीय संघाला १४५ धावांत गुंडाळलं. रोहित शर्माचा (६६) अपवाद वगळता एकाही भारतीय खेळाडूला आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी करता आली नाही. जो रुट यानं अचूक टप्यावर गोलंदाजी करत भारतीय फलंदाजांना फिरकीच्या जाळ्यात अडकवलं. रुटनं पाच विकेट घेत भारतीय संघाचं कंबरडं मोडलं आहे.

जो रुट यानं पाच बळी घेत नवीन किर्तीमान आपल्या नावावर केला आहे. जो रुटनं ८ धावांच्या मोबदल्यात पाच बळी घेत भारताचा डाव गुंडाळण्यात सिंहाचा वाटा उचलला. कसोटी सामन्यात सर्वाधिक कमी धावा देत सर्वोत्कृष्ट गोलंदाजी करणाऱ्यांमध्ये जो रुट याचं नाव सामील झालं आहे. याआधी असा कारनामा टीम मे आणि मायकल क्लार्क यांनी केला आहे. १९९३ मध्ये टीम मे यानं अॅडिलेडवर वेस्ट इंडिजविरोधात ९ धावांच्या मोबदल्यात पाच बळी घेण्याचा पराक्रम केला होता. त्यानंतर २००४ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या मायकल क्लार्कनं भारताविरोधात ९ धावांच्या मोबदल्यात ६ बळी घेतले होते. त्यानंतर इंग्लंडचा कर्णधार जो रुट यानं आज, अहमदाबाद कसोटीत ८ धावांच्या मोबदल्यात पाच गडी बाद करण्याचा पराक्रम केला आहे.

इंग्लंडचा पहिला डाव ११२ धावांत आटोपला होता, त्यामुळे भारताला पहिल्या डावाअखेरीस केवळ ३३ धावांची आघाडी मिळाली. आता इंग्लंड संघाने दुसऱ्या डावांत झटपट चार गडी गमावले आहेत. दुसऱ्या डावांत इंग्लंडचा संघ किती धावांपर्यंत मजल मारतो? याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.