इंटरनेट कनेक्शन आणि सव्‍‌र्हरमधील बिघाडाचा फटका पहिल्यावहिल्या ऑनलाइन फिडे बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेला बसला. रशियाविरुद्धच्या अंतिम सामन्यातील पहिली फेरी बरोबरीत सुटल्यानंतर दुसऱ्या फेरीत इंटरनेट खंडित झाल्याबाबत भारताने दाद मागितल्यानंतर भारत आणि रशिया या दोन्ही संघांना संयुक्त विजेते घोषित करण्यात आले.

दुसऱ्या फेरीत जलद प्रकारातील जगज्जेती कोनेरू हम्पी तसेच युवा बुद्धिबळपटू निहाल सरिन आणि दिव्या देशमुख यांच्यातील डावादरम्यान इंटरनेट कनेक्शन मध्येच खंडित झाले. त्यामुळे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. दुसरी फेरी ४.५-१.५ अशा फरकाने जिंकून रशिया १८ वर्षांनंतर पहिल्यांदाच विजेता बनण्यासाठी दावेदार होता. पण इंटरनेटमधील बिघाड झाल्याबद्दल भारताने जागतिक बुद्धिबळ महासंघाकडे (फिडे) अधिकृतपणे दाद मागितली. त्यानंतर फिडेच्या आढावा समितीने या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर महासंघाचे अध्यक्ष अर्कादी डोर्कोव्हिच यांनी विजेतेपद विभागून देण्याचा निर्णय घेतला.

रशियाला २००२नंतर बुद्धिबळ ऑलिम्पियाडचे जेतेपद मिळवता आलेले नाही. भारताने पहिल्यांदाच या स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. इंटरनेटमधील बिघाडाचा फटका भारत आणि अर्मेनिया यांच्यातील उपांत्यपूर्व सामन्यालाही बसला होता. पण अर्मेनियाने दुसऱ्या फेरीतून माघार घेतल्याने भारताने आगेकूच केली होती.

रशियासारख्या तुल्यबळ प्रतिस्पध्र्याविरुद्ध खेळताना भारताने पहिल्या फेरीत पाच वेळच्या जगज्जेत्या विश्वनाथन आनंदला विश्रांती दिली होती. कर्णधार विदित गुजराथीने पहिल्या पटावर खेळताना जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानी असलेल्या इयान नेपोमनियाचीला बरोबरीत रोखले होते. विदितने नेपोमनियाची विरुद्धच्या लढतीसाठी जय्यत तयारी केली होती, हे त्याच्या खेळावरून स्पष्टपणे जाणवत होते. डावाच्या मधल्या टप्प्यात विदितने नियंत्रण मिळवले होते, पण नेपोमनियाचीने विदितचा झंझावात रोखत त्याला बरोबरी पत्करण्यास भाग पाडले.

जलद प्रकारातील जगज्जेती कोनेरू हम्पी हिने कॅटेरिना लॅगनो हिच्याविरुद्ध दमदार सुरुवात केली होती, पण दोघींमधील डाव अखेर बरोबरीत सुटला. पेंटाल्या हरिकृष्णने व्लादिस्लाव्ह आर्तेमिएव्ह याच्याविरुद्ध बरोबरी पत्करली. द्रोणावल्ली हरिकाने अलेक्झांड्रा कोस्टेनियूक हिच्याविरुद्धचा डाव बरोबरीत सोडवला. युवा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंद आणि अ‍ॅलेक्सी सराना यांच्यातील डाव बरोबरीत सुटला. अखेरच्या डावात दिव्या देशमुख हिनेही पोलिना शुवालोव्हा हिला बरोबरी पत्करण्यास भाग पाडले.

दुसऱ्या फेरीत भारताने आनंदला मैदानात उतरवले. विदितने डॅनिल दुबोव्हविरुद्ध तर आनंदने नेपोमनियाचीविरुद्ध बरोबरी पत्करत भारताला चांगली सुरुवात करून दिली. पण हम्पीला अलेक्झांड्रा गोऱ्याचकिना हिच्याविरुद्ध बरोबरी पत्करावी लागली. द्रोणावल्ली हरिकाने कोस्टेनियूकविरुद्ध बरोबरी पत्करल्याने निहाल आणि दिव्या यांच्या डावाकडे सर्वाचे लक्ष लागले होते. पण पाचव्या डावात निहालला आंद्रेय इसिपेंको आणि सहाव्या डावात दिव्याला शुवालोव्हा हिच्याकडून हार पत्करावी लागल्याने रशियाने दुसरी फेरी ४.५-१.५ अशी जिंकली होती.