फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण यांचा योग्य समन्वय नसेल, तर कोणत्याही संघाची कामगिरी अपेक्षेप्रमाणे होत नाही. खूप वर्षांपूर्वी भारताने वेस्ट इंडिज आणि इंग्लंडमध्ये मिळवलेल्या ऐतिहासिक कसोटी विजयांमध्ये क्षेत्ररक्षणाचा मोलाचा वाटा होता, तर रविवारी जिंकलेल्या चॅम्पियन्स करंडकातील विजेतेपदामध्ये क्षेत्ररक्षणाचे अतुलनीय योगदान होते, असे म्हटल्यास नक्कीच वावगे ठरणार नाही. भारताला एकनाथ सोलकर, अजित वाडेकर, कपिल देव, यशपाल शर्मा यांच्यासारखे दर्जेदार क्षेत्ररक्षक लाभले होते. पण क्रिकेट जगताला एखादा खेळाडू दर्जेदार क्षेत्ररक्षणाच्या जोरावर संघात स्थान मिळवू शकतो, हे जॉन्टी ऱ्होड्सने दाखवून दिले. त्यानंतरच्या काळात भारताला अजय जडेजा, रॉबिन सिंग, त्यानंतर युवराज सिंग आणि मोहम्मद कैफसारखे अप्रतिम क्षेत्ररक्षक लाभले खरे, पण गेली काही वर्षे भारतीय संघाचे सुमार क्षेत्ररक्षण टीकेचे धनी ठरत होते. पण चॅम्पियन्स करंडकातील भारतीय संघ क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत सर्वात उजवा दिसला आणि भारताच्या विजेतेपदाचे हे एक महत्त्वाचे कारण ठरले.
गेल्या वर्षी कॉमनवेल्थ बँक सीरिज क्रिकेट स्पध्रेत कर्णधार धोनीने ‘रोटेशन पॉलिसी’ राबवली ती क्षेत्ररक्षण डोळ्यापुढे ठेवूनच. कारण तिन्ही सलामीवीरांचे क्षेत्ररक्षण लौकिकाला साजेसे होत नव्हते. हे तिन्ही सलामीवीर आता संघात नाहीत आणि क्षेत्ररक्षणाचा दर्जाही सुधारलेला दिसला. धोनीने या मालिकेत पाच झेलसह चार यष्टिचीत केल्या, त्यापाठोपाठ या संघातील सर्वात उजवा क्षेत्ररक्षक समजल्या जाणाऱ्या सुरेश रैनाने तब्बल सहा झेल टिपले, तर आर. अश्विनने चार. पहिल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात धोनी आणि रैनाने पकडलेले दोन्ही झेल साधे दिसत असले तरी सोपे नव्हते. वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात ख्रिस गेलचा अश्विनने अप्रतिम झेल टिपला होता, स्वत:च्या गोलंदाजीवरही त्याने सूर मारत झेल पकडण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यामध्ये त्याला यश मिळाले नाही. याच सामन्यातील धोनीने अप्रतिमपणे डॅरेन ब्राव्होला यष्टिचीत केले होते. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीचे प्रभावी क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. अश्विन गोलंदाजी करताना एक चेंडू कामरान अकमलच्या बॅटची कडा घेऊन धोनीच्या दिशेने गेला, धोनीला तो झेल टिपता आला नाही, पण ‘लेग स्लिप’मध्ये असलेल्या विराट कोहलीने अप्रतिम सूर मारत झेल टिपला. त्याने जुनैद खानला ज्या पद्धतीने धावचीत केले, ते तर अफलातूनच होते. जुनैदने ‘शॉर्ट मिड ऑफ’ला मारलेला फटका कोहलीने सूर मारत अडवला, त्यानंतर त्याने थेट फेकीने जुनैदला धावचीत केले होते.
श्रीलंकेविरुद्धच्या उपांत्य सामन्यात रैनाने चित्त्याप्रमाणे झेपावत शिफातीने दुसऱ्या ‘स्लिप’मध्ये टिपलेले झेल हे अद्भुत असेच होते. आपला झेल रैनाने पकडलाय, यावर श्रीलंकेच्या कुशल परेरा आणि कुमार संगकारा यांना विश्वासच बसला नव्हता. अंतिम सामन्यात अ‍ॅलिस्टर कुकचा अप्रतिम झेल पहिल्या ‘स्लिप’मध्ये आर. अश्विनने पकडला, त्यानंतर ईऑन मॉर्गन आणि रवी बोपारा यांचे झेलही आर. अश्विनने अप्रतिम पकडले. धोनीने चपळाईने जोनाथन ट्रॉटला केलेले यष्टिचीत डोळ्यांचे पारणे फेडणारे होते.
या स्पर्धेत रैनाने क्षेत्ररक्षणात जी चपळता आणि ऊर्जा दाखवली त्याला तोडच नव्हती. झेलसह त्याने बऱ्याच धावाही वाचवल्या आणि जास्त धावा होत नसूनही तो संघासाठी लाभदायक ठरत होता. रैनाबरोबरच धोनी, कोहली, दिनेश कार्तिक, शिखर धवन, आर. अश्विन यांच्यासह बऱ्याच जणांनी क्षेत्ररक्षणात पैकीच्या पैकी गुण कमावले. एखाद-दुसरा अपवाद वगळला तर या स्पर्धेत भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण वाखाणण्याजोगेच होते.
फ्लेचर, आगे बढो!
भारताने गॅरी कर्स्टन यांच्या समवेत विश्वचषक उंचावला, तेव्हा आपल्याला खऱ्या अर्थाने प्रशिक्षकपदाची जाणीव झाली. पण त्यानंतर डंकन फ्लेचर यांना प्रशिक्षकपदी आणल्यानंतर भारताच्या पदरी निराशाच पडताना दिसत होती. मग तो इंग्लंडचा दौरा असो किंवा ऑस्ट्रेलियाचा. त्यानंतर इंग्लंडनेही भारतात येऊन आपली अब्रू वेशीवर टांगली आणि ‘फ्लेचर परत जा’च्या नाऱ्याला सुरुवात झाली. त्यानंतर भारताने ऑस्ट्रेलियावर विजय मिळवल्यावर या नाऱ्याला पूर्णविराम मिळाला. या दरम्यानच्या काळात फ्लेचर यांचा करार संपत आला असताना त्यांना मुदतवाढ देण्यात आली आणि बऱ्याच जणांनी कपाळावर हात मारला. पण भारताने जेव्हा चॅम्पियन्स करंडक जिंकला, तेव्हा टीकाकारांनी त्यांचेही कौतुक केले. सोन्याला शुद्ध होण्यासाठी जसे अग्नीतून जावे लागते, तशीच अग्निपरीक्षा दिल्यानंतर फ्लेचर यांना घवघवीत यश मिळाले आहे. भारताच्या या यशामध्ये फ्लेचर यांचाही मोठा वाटा आहे, हे विसरून चालणार नाही. पण या यशानंतर हुरळून न जाता संघाचा विजयाचा ध्वज कायम उंचावत ठेवण्याची मोठी जबाबदारी फ्लेचर यांच्यावर असेल.