जागतिक फुटबॉल फेडरेशन अर्थात फिफाने पाकिस्तान फुटबॉल फेडरेशनवर कारवाई केली आहे. निवडून दिलेल्या समितीत हस्तक्षेप केल्याने फिफाने पाकिस्तान फुटबॉल फेडरेशनला आपल्या यादीतून वगळलं आहे. फिफा नियमांचं उल्लंघन केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. फिफाच्या निर्णयामुळे पाकिस्तान फुटबॉल फेडरेशनचे धाबे दणाणले आहेत.

फिफा आणि नियामक मंडळात तिसऱ्या पक्षानं हस्तक्षेप केल्यानं नियमांचं उल्लंघन होत असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. पाकिस्तान फुटबॉल फेडरेशनच्या मुख्यालयाचा ताबा घेऊन बेकायदेशीर निवडणुका घेत समिती स्थापित केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. यापूर्वीची समिती फिफाने स्थापित केली होती. मात्र ती समिती बरखास्त केल्याने फिफाने आपला रोष व्यक्त केला आहे. फिफा समितीचे अध्यक्ष हारून मालिक होते. त्यांना हटवल्याने फिफाने पाकिस्तान फुटबॉल फेडरेशनला दणका दिला आहे. या निर्णयामुळे आता पाकिस्तान फुटबॉल फेडरेशनला फिफाकडून कोणतीही आर्थिक मदत मिळणार नाही. त्यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या पाकिस्तान फुटबॉल फेडरेशनचा पाय आणखी खोलात जाणार आहे.

(वाचा: IPL 2021 : कोहलीच्या RCB ला अजून एक धक्का, अष्टपैलू खेळाडूला करोनाची लागण)

‘पाकिस्तान फुटबॉल फेडरेशनने बरखास्त केलेली समिती पुनर्स्थापित केल्यानंतरच ही कारवाई मागे घेण्यात येईल. त्याचबरोबर सर्व आर्थिक व्यवहार आणि व्यवस्थापन या समितीच्या हाती आहेत याची हमी द्यावी लागेल. तसेच भविष्यात फिफाने स्थापित केलेल्या समितीत कोणताही हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही’, असा इशारा फिफाने पाकिस्तान फुटबॉल फेडरेशनला दिला आहे.

एकिकडे पाकिस्तान फुटबॉल फेडरेशनसोबत  चॅडियन फुटबॉल असोसिएशनवर देखील कारवाई करण्यात आली आहे. सरकारने चॅडियन फुटबॉल असोसिएशनमध्ये हस्तक्षेप केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. सरकारने आपल्या हातात सर्व व्यवहार घेतल्याने फिफाने नाराजी व्यक्त केली आहे. सरकार हस्तक्षेप करणं जोपर्यंत सोडत नाही तोपर्यंत चॅडियन फुटबॉल असोसिएशन यादीतून बाद असेल असं फिफाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.