जागतिक फुटबॉल महासंघाला (फिफा) भ्रष्टाचार आणि लाचखोरीने विळखा घातला आहे. भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमुळे फिफाची विश्वासार्हताही कमी झाली आहे. ही विश्वासार्हता पुन्हा कमाविण्याचे आव्हान अवघड आहे, मात्र अशक्य नाही, असे ठाम मत ब्राझीलचे दिग्गज फुटबॉलपटू झिको यांनी व्यक्त केले. फिफा अध्यक्षपदाच्या शर्यतीत झिको यांनी उतरल्याचे ठरवले आहे आणि अध्यक्षपदाची निवडणूक आपणच जिंकू, असा आत्मविश्वास त्यांना वाटतोय. मात्र, फिफामधील घडामोडींनी त्यांना चिंतित केले असून फुटबॉलपेक्षा आर्थिक फायद्याची चिंता करणारी माणसे फिफाचा गाडा हाकत होती, असा आरोप त्यांनी केला आहे. इंडियन सुपर लीगच्या निमित्ताने झिको पुन्हा एकदा भारतात दाखल झाले आहेत. त्यानिमित्ताने त्यांच्याशी केलेली ही खास बातचीत-

* इंडियन सुपर लीगच्या निमित्ताने भारतात पुन्हा येऊन कसे वाटत आहे?
गोव्यात येऊन चांगले वाटत आहे. गतवर्षी गोवा एफसी क्लबच्या मालकांना पुन्हा येण्याचा आणि गोवा क्लबसाठी काम करणार असल्याचा शब्द दिला होता. गोवा क्लबला जेतेपद पटकावून देणे, हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. कठीण प्रसंगीही येथील प्रेक्षकांचा मिळत असलेला पाठिंबा पाहून खूप बरे वाटते.
* गतवर्षी तुम्हाला उपांत्य फेरीपर्यंतच समाधान मानावे लागले होते. ती सल भरून काढण्यासाठी क्लबमध्ये कोणते बदल केले आहेत?
माझ्या आवडीचे खेळाडू आम्ही निवडले आहेत. आक्रमक खेळ या माझ्या रणनीतीवर आम्ही काम करत आहोत. फुटबॉल हा सांघिक खेळ आहे आणि अनेकदा संघात मजबूत बचावफळी असूनही यश मिळत नाही. त्यामुळे प्रामुख्याने या स्पध्रेवर लक्ष्य केंद्रित करून काम करायला हवे आणि त्यासाठी पूर्वतयारी चांगली होणे महत्त्वाची आहे. गतवर्षी आम्हाला काही समस्यांना तोंड द्यावे लागले. तुलनेने कमकुवत संघासोबत मला काम करावे लागले आणि सत्राच्या सुरुवातीला संघाबाबत फार माहितीही नव्हती. बराच वेळ संशोधनात वाया घालवल्यानंतर सुदैवाने आम्ही चांगली कामगिरी करण्यात यश मिळवले. यंदा या समस्या टाळायला हव्यात आणि आशा करतो की, यंदाच्या सत्राची सुरुवात सकारात्मक करू.
* पहिल्या सत्रात सर्व संघ नवीन होते, पण दुसऱ्या सत्रात प्रतिस्पध्र्याचा अंदाज घेता येऊ शकतो. त्यामुळे आता रणनीतीत बदल करणे गरजेचे आहे का?
प्रत्येक संघाला विजय हवा असतो आणि या लक्ष्याच्या दृष्टीने प्रत्येक जण काम करत आहे. गतसत्रात मी इतर संघांचे आणि खेळाडूंचे निरीक्षण केले आहे. त्यामुळे माझी रणनीती तयार आहे. आम्ही सरावासाठी खूप मेहनत घेत आहोत. दुसऱ्या सत्रात खेळण्यासाठी आम्ही चांगल्या फॉर्मात आहोत. संघातील प्रत्येक खेळाडू शंभर टक्के योगदान देईल. तरीही प्रतिस्पर्धीना कमी लेखण्याची चूक करणार नाही. प्रत्येक परिस्थितीसाठी सज्ज राहण्याची आवश्यकता आहे.
* गेल्या काही महिन्यांत फिफाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे संघटनेने विश्वासार्हता गमावली आहे. हा काळ तुमच्यासाठी कसा होता?
ही दुर्दैवी घटना आहे. या घटनेतून एक बाब समजते आणि ती म्हणजे, की येथे फुटबॉलव्यतिरिक्त आर्थिक फायद्याचीच चिंता जास्त होत होती. फुटबॉल हे माझे आयुष्य आहे आणि सध्याच्या परिस्थितीने फार वेदना झाल्या. पोलीस अधिकारी हे प्रकरण योग्य पद्धतीने हाताळत आहेत आणि यामधील आरोपींची नावे बाहेर काढत आहेत. या आरोपींची फिफातून हकालपट्टी होणे आवश्यक आहे. मी आशा करतो की, आता आर्थिक फायद्याव्यतिरिक्त फिफामध्ये फुटबॉल हा चिंतनाचा विषय बनेल.
* तुम्ही फिफा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरण्याची घोषणा केली आहे. हे तुमच्यासाठी नवीन आव्हान आहे आणि त्यासाठी तुम्ही कशी तयारी केली आहे?
फिफाने उमेदवार निवडण्याची प्रक्रिया बदलल्यास मी पुढाकार घेईन. अध्यक्षपदाचे आव्हान पेलण्यासाठी मी तयार आहे आणि जानेवारीत निवडणूक झाल्यास सर्व मापदंड पार करण्यास मी सज्ज आहे.
ल्ल अध्यक्ष म्हणून निवडून आल्यास फिफाने गमावलेली विश्वासार्हता पुन्हा मिळवण्याचे आव्हान तुम्ही कसे पेलाल?
हो, हे खरे आव्हान आहे. मात्र, सर्वप्रथम फिफा अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या नियमांचा फेरविचार करेन. फिफा ही महत्त्वाची संघटना आहे आणि त्यांच्यावर जगातील दोनशेहून अधिक संलग्न संघटनांची जबाबदारी आहे. माझ्याकडील फुटबॉल संघटना चालवण्याचा अनुभव पाहता, अध्यक्षपदाचा मी प्रबळ दावेदार आहे. अध्यक्षपदासाठी आवश्यक असलेले कौशल्य माझ्याकडे आहे.
* कोणते मुद्दे घेऊन तुम्ही निवडणुकीत उतरणार आहात?
मी त्याचे नियोजन तयार करत आहे. असे अनेक विषय आहेत, जे सोडवणे महत्त्वाचे आहेत.