आखातातील कतार देशाला २०२२च्या फिफा विश्वचषकाच्या आयोजनाचे हक्क मिळाल्यानंतर काही दिवसांनी आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघा(फिफा)चे माजी उपाध्यक्ष जॅक वॉर्नर आणि त्यांच्या कुटुंबीयांना कतारच्या माजी फुटबॉल पदाधिकाऱ्याने दोन दशलक्ष अमेरिकन डॉलर लाच दिल्याचे वृत्त आहे.
आशियाई फुटबॉल महासंघाचे माजी अध्यक्ष मोहम्मद बिन हमाम यांच्या मालकीच्या एका कंपनीने वॉर्नर यांना १.२ दशलक्ष डॉलर दिल्याचे वृत्त ‘द टेलिग्राफ’ने दिले आहे. वॉर्नर यांच्या मुलाला ७५०,००० डॉलर तर एका कर्मचाऱ्याला ४००,००० डॉलर देण्यात आले आहेत. २००५ ते २०१० मधील कामानिमित्त बिन हमाम यांच्या केमको कंपनीकडून वॉर्नर यांच्या कंपनीला हे पैसे देण्यात आले आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.
रशियाला २०१८ विश्वचषकाचे आणि कतारला २०२२ फिफा विश्वचषकाचे हक्क मिळवून देणाऱ्या २२ लोकांमध्ये वॉर्नर यांचा समावेश होता. कतारला २०२२च्या फिफा विश्वचषकाचे हक्क प्रदान करणे, हा फुटबॉलच्या इतिहासातील सर्वात वादग्रस्त निर्णय ठरला. ही स्पर्धा पहिल्यांदाच हिवाळ्यात आयोजित करण्यात आल्यामुळे अनेक देशांनी त्यावर टीका केली आहे.