‘फिफा’च्या कार्यकारिणी समितीची अतिरिक्त सभा २० जुलैला झुरिच येथे होणार आहे. सेप ब्लाटर यांच्यानंतर ‘फिफा’च्या अध्यक्षपदावर कोण विराजमान होणार, यासाठीच्या निवडणुकीची तारीख या दिवशी निश्चित होणार आहे.ब्लाटर १९९८ पासून ‘फिफा’चे अध्यक्षपद सांभाळत आहे. ‘फिफा’च्या अधिकाऱ्यांनी लाच घेतल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर ब्लाटर यावलपन्नी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

वेस्ले हॉल यांचा ‘हॉल ऑफ फेम’मध्ये समावेश
दुबई : वेस्ट इंडिजचे माजी वेगवान गोलंदाज वेस्ले हॉल यांचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या मानाच्या हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला आहे. सार्वकालीन महान ८० खेळाडूंच्या मांदियाळीत स्थान पटकावणारे हॉल वेस्ट इंडिजचे १८वे क्रिकेटपटू ठरले आहेत. ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात सबिना पार्क येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीदरम्यान माजी महान वेगवान गोलंदाज कोर्टनी वॉल्श यांच्या हस्ते हॉल यांना ‘हॉल ऑफ फेम’ पुरस्काराने गौरवण्यात आले. यंदा महिला क्रिकेटपटू बेटी विल्सन, अनिल कुंबळे, मार्टिन क्रो यांच्यासह सन्मानित होणारे हॉल चौथे क्रिकेटपटू आहेत. ‘‘या मांदियाळीत समावेश झाला हा माझा सन्मान आहे. खेळाप्रति अतुलनीय योगदान देणाऱ्या खेळाडूंमध्ये समावेश व्हावा ही भावना सुखावणारी आहे,’’ असे हॉल यांनी सांगितले. १९५८ ते १९६९ या कालावधीत हॉल यांनी ४८ कसोटीत वेस्ट इंडिजचे प्रतिनिधित्व करताना १९२ विकेट्स मिळवल्या. १७० प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये हॉल यांनी २६.१४च्या सरासरीने ५४६ विकेट्स मिळवल्या आहेत.