फिफाच्या शिस्तपालन समितीची कारवाई

पदाचा गैरवापर केल्याचा ठपका

जागतिक फुटबॉल संघटनेचे (फिफा) निलंबित अध्यक्ष सेप ब्लाटर आणि युरोपियन फुटबॉल महासंघाचे (युएफा) प्रमुख मायकल प्लॅटिनी यांच्यावर आठ वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली आहे. ब्लाटर यांनी पदाचा गैरवापर करून प्लॅटिनींना दोन दशलक्ष डॉलर दिल्याच्या आरोपाखाली फिफा शिस्तपालन समितीने ही कारवाई केली. यापूर्वी याच आरोपाखाली दोघांना ९० दिवस निलंबित करण्यात आले होते.

शिस्तपालन समितीच्या या कारवाईमुळे ब्लाटर यांचे फिफावरील १७ वर्षांचे वर्चस्व संपुष्टात आले आहे, तर फेब्रुवारी २०१६ मध्ये होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत प्लॅटिनींना सहभाग घेता येणार नाही. १९९८ पासून फिफा अध्यक्षपदावर विराजमान असलेल्या ब्लाटर यांना ५० हजार अमेरिकन डॉलरचा दंड ठोठावण्यात आला आहे. दुसरीकडे युएफाचे अध्यक्ष आणि फिफाचे उपाध्यक्ष असलेल्या प्लॅटिनींना ८० हजार अमेरिकन डॉलरचा दंड ठोठावला आहे.

फिफाच्या निवेदनात या दोघांनी पदाचा गैरवापर केल्याचे ठळकपणे नमूद करण्यात आले आहे. २०११मध्ये ब्लाटर यांनी प्लॅटिनींना दिलेल्या २ दशलक्ष डॉलरची चौकशीही फिफाकडून करण्यात येणार आहेत. १९९९ ते २००२ या कालावधीत प्लॅटिनी यांनी सल्लागाराची जबाबदारी पार पाडल्यामुळे हे पैसे दिल्याचे ब्लाटर यांनी सांगितले. दरम्यान, फिफा न्यायालयाने दोघांवरील भ्रष्टाचाराचे आरोप हटवले असून दोघांवर हितसंबंध जपण्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

‘‘या आर्थिक व्यवहाराला कोणताही कायदेशीर आधार नाही. ऑगस्ट १९९९ मध्ये या दोघांमध्ये तोंडी करार झाला होता. त्यामुळे ब्लाटर यांना या व्यवहाराचा लेखी किंवा इतर कायदेशीर पुरावा दाखवता आला नाही,’’ अशी माहिती निवेदनात देण्यात आली आहे. तसेच ब्लाटर यांची कृती फिफाच्या नियमांना तिलांदजी देणारी आहे. त्यांनी आपल्या अध्यक्षपदाचा गैरवापर केला आहे, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

ब्लाटर आणि प्लॅटिनी हे या बंदीला क्रीडा लवादात आणि स्वित्र्झलड दिवाणी न्यायालयात आव्हान देऊ शकतात. त्यामुळे आपली पत वाचवण्यासाठी ब्लाटर हे पाऊल उचलण्याची शक्यता आहे, तर अध्यक्षपदाची स्वप्ने पाहणाऱ्या प्लॅटिनींसाठी आणखी एक संधी आहे. २६ फेब्रुवारीला होणाऱ्या या निवडणुकीसाठी २६ जानेवारीपर्यंत अर्ज भरता येणार आहेत.

घटनाक्रम

*मे २०१५

चौदा फिफा अधिकाऱ्यांना स्वित्र्झलड येथील मुख्यालयातून भ्रष्टाचार आणि लाचखोरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. या  आरोपांमुळे ब्लाटर यांना अध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागले.

*सप्टेंबर २०१५

स्वित्र्झलड पोलिसांनी ब्लाटर यांच्यावर गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

*ऑक्टोबर २०१५

सेप ब्लाटर आणि मायकल प्लॅटिनी यांच्यावर ९० दिवसांची बंदी

*नोव्हेंबर २०१५

फिफा शिस्तपालन समितीकडून या प्रकरणाचा अहवाल सादर आणि प्लॅटिनींवर आजीवन बंदी घालण्याचा प्रस्ताव

*डिसेंबर २०१५

ब्लाटर व प्लॅटिनी यांच्यावर आठ वर्षांची बंदी.

*प्रिन्स अली बिन अल-हुसेन : ३९ वष्रे, जॉर्डन, फिफाचे माजी उपाध्यक्ष आणि २०१५च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील उमेदवार

*शेख सलमान बिन इब्राहिम अल-खलिफा : ५० वष्रे, बहरिन, आशियाई फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष

*जेरोमे चॅम्पेग्ने : ५७ वष्रे, फ्रान्स, फिफाचे माजी साहाय्यक सरचिटणीस

*टोकियो सेक्सव्ॉले : ६२ वष्रे, दक्षिण आफ्रिका, राजकारणी व उद्योगपती

*गिआनी इंफांटिनो : ४५ वष्रे, स्वित्र्झलड, युएफाचे सरचिटणीस व फिफा सुधारणा समिती सदस्य

समितीने विश्वासघात केला – ब्लाटर

लुसाने येथील क्रीडा लवादात या बंदीला आव्हान देण्यापूर्वी फिफाच्या आवाहन समितीसमोर आपले प्रकरण उपस्थित करणार आहे. माझ्यासोबत विश्वासघात झाला आहे. शिस्तपालन समितीने पुरावे अमान्य केले आणि सत्य बाब समोर येऊच दिली नाही. मी याविरोधात लढणार. माझ्यासाठी आणि फिफासाठी मी लढणार, असे ब्लाटर म्हणाले.