विश्वचषकामध्ये इटलीच्या खेळाडूचा चावा घेतल्याप्रकरणी फिफाने घातलेली चार महिन्यांची बंदी पूर्ण झाल्यावर लुइस सुआरेझ पहिल्यांदाच मैदानात उतरणार आहे तो बार्सिलोना संघाकडून. चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेमध्ये बार्सिलोना आणि रिअल माद्रिद या दोन्ही बलाढय़ संघांमध्ये तुंबळ युद्ध रंगणार असून सुआरेझ या सामन्यामध्ये पुनरागमन करणार आहे.
विश्वचषकामध्ये इटलीच्या जॉर्जिओ चिएलिनीला सामन्यादरम्यान सुआरेझ खांद्यावर चावला होता. याप्रकरणी सुआरेझवर फुटबॉल विश्वातून जोरदार टीका झाली असली तरी मायदेशामध्ये तो नायक ठरला होता, त्याचे जोरदार स्वागत करण्यात आले होते. पण फिफाच्या बंदीमुळे तब्बल १२२ दिवसांनंतर सुआरेझ मैदानात उतरणार आहे. या प्रकरणानंतरही लिव्हरपूल संघातील सुआरेझला बार्सिलोनाने संघात सामील केले.
‘‘या प्रकरणानंतर मी धास्तावलेलो होतो. पण पेरे गुआरडिओला यांनी मला बार्सिलोनाने करारबद्ध केल्याचे सांगितले आणि मला रडू कोसळले. ज्या वातावरणातून मी जात होतो, ते पाहता बार्सिलोनाने माझ्यावर जो विश्वास ठेवला त्याबद्दल मी आनंदी आहे,’’ असे सुआरेझने सांगितले.
लिओनेल मेस्सी आणि नेयमार यांच्यासारख्या मोठय़ा खेळाडूंबरोबर खेळण्याची संधी सुआरेझला बार्सिलोनाकडून मिळणार आहे.