जागतिक फुटबॉल फेडरेशनचे (फिफा) अध्यक्ष जिआनी इन्फॅन्टीनो यांनी दर दोन वर्षांनी फुटबॉल मिनी-विश्वचषक आयोजित करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. हा प्रस्ताव फिफाने मान्य केल्यास आंतरराष्ट्रीय स्तरावरील फुटबॉल स्पर्धांमध्ये एका स्पर्धेची भर पडणार असून हा मिनी-विश्वचषक दर दोन वर्षांनी आठ संघांदरम्यान खेळवण्यात येण्याची शक्यता आहे. ‘फायनल ८’ असे या स्पर्धेचे प्रस्तावित नाव असून ही स्पर्धा अंदाजे २५ मिलियन डॉलर्सची असेल.

आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये क्रांती घडवून आणण्याच्या दृष्टीने या स्पर्धेकडे बघितले जात आहे. जगातील सर्वोकृष्ट ८ देशांना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. काही गुंतवणुकदारांचा गट या स्पर्धेसाठी २५ मिलियन डॉलर्सची गुंतवणूक करण्यास तयार असून २०२१ पासून ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात या स्पर्धेचे आयोजन करण्यात येईल, अशी माहिती इन्फॅन्टीनो यांनी दिली.

‘फायनल ८’ स्पर्धेच्या आयोजनासाठी कॉन्फेडरेशन कपचे आयोजन रद्द करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. कॉन्फेडरेशन कपचे आयोजन दर ४ वर्षांनी विश्वचषक स्पर्धेच्या आदल्या वर्षी करण्यात येते. मात्र, या स्पर्धेच्या जागी ‘फायनल ८’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले तर दर दोन वर्षांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन करण्यात येईल. ही बाब फुटबॉलप्रेमींना रूचेल की स्पर्धांच्या भडिमाराने चाहत्यांचा रस कमी होईल? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.