X

Live U 17 World Cup Football – घानाची दिमाखात सुरुवात, कोलंबियावर मात; न्यूझीलंड-तुर्की सामना बरोबरीत

U-17 विश्वचषकाला सुरुवात

दोन वेळा स्पर्धेचं विजेतेपद पटकावणाऱ्या घानाने १७ वर्षाखालील मुलांच्या फुटबॉल विश्वचषकात आपला पहिला विजय मिळवला आहे. कोलंबियावर १-० ने मात करत, घानाने स्पर्धेची चांगली सुरुवात केली आहे. घानाकडून सादीक इब्राहीमने सामन्यात एकमेव गोल केला, हा गोल सामन्यात निर्णायक ठरला. नवी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरु मैदानात झालेल्या सामन्यात संपूर्ण वेळ घानाचं वर्चस्व पहायला मिळालं.

सुरुवातीच्या काही मिनीटांमध्ये दोन्ही संघांनी बचावात्मक पवित्रा अवलंबल्यामुळे सामना काहीसा निरस झाला. मात्र अखेर सादीक इब्राहीमने गोल करत ही कोंडी फोडली आणि आपल्या संघाचा विजय निश्चीत केला. दक्षिण आफ्रिकेत झालेल्या पात्रता फेरीत उप-विजेत्या ठरलेल्या घानाला सुरुवातीच्या काही मिनीटांमध्ये कोलंबियाने टक्कर देण्याचा प्रयत्न केला, मात्र चांगल्या चालींचं गोलमध्ये रुपांतर करण कोलंबियाच्या खेळाडूंना काही केल्या जमलं नाही.

कोलंबियाने पहिल्या सत्राच्या सुरुवातीला आक्रमक खेळ करण्याचा प्रयत्न केला. लेफ्ट विंगर ब्रायन गोमेझचा अपवाद वगळता एकाही कोलंबियन खेळाडूला चमक दाखवता आली नाही. ब्रायन कोलंबियाकडून गोल करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचे प्रयत्न अपुरे पडले. त्यानंतर कोलंबियाचे खेळाडू संपूर्ण सामनाभर बचावात्मक पवित्र्यात खेळताना पहायला मिळाले, ज्याचा फटका त्यांना बसला.

तर दुसरीकडे नवी मुंबईच्या डी.वाय.पाटील मैदानावर झालेला न्यूझीलंड विरुद्ध तुर्की हा सामना १-१ असा बरोबरीत सुटला. सामन्याच्या १८ व्या मिनीटाला स्ट्राईकर अहमदने तुर्कीला सामन्यात आघाडी मिळवून दिली. यानंतर बराच वेळ सामन्यात तुर्कीचा संघ आघाडीवर होता. मात्र न्यूझीलंडचा कर्णधार मॅक्स माटाने ५८ व्या मिनीटाला गोल झळकावत आपल्या संघाला बरोबरी साधून दिली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ८ वर्षांपूर्वी झालेल्या विश्वचषक सामन्यात न्यूझीलंड आणि तुर्की यांच्यातला सामनाही बरोबरीत सुटला होता.

पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यात तुर्कीचा संघ पहिल्या सत्रात वरचढ दिसत होता. छोटे-छोटे पास करत तुर्कीच्या खेळाडूंनी न्यूझीलंडच्या संघाला चांगलच चिंतेत पाडलं होतं. मात्र न्यूझीलंडच्या संघाने दुसऱ्या सत्रात पुनरागमन करत सामन्यात बरोबरी साधली. अखेरच्या सत्रात दुसरा गोल करुन सामन्यात बरोबरी साधण्याची संधी तुर्कीच्या संघाकडे आली होती. मात्र त्याचा फायदा उचलणं तुर्कीच्या संघाला जमलं नाही.

First Published on: October 6, 2017 11:03 pm
  • Tags: FIFA U-17 Football World Cup, Ghana vs Colombia, New Zealand vs Turkey,
  • Outbrain