आपल्या पहिल्या सामन्यात झालेल्या पराभवाची मरगळ झटकत मालीने विश्वचषक स्पर्धेत आपला पहिला विजय नोंदवला आहे. नवी मुंबईतल्या डी.वाय.पाटील मैदानावर झालेल्या सामन्यात तुर्कीच्या संघावर ३-० ने मात करत मालीने स्पर्धेतलं आपलं आव्हान कायम राखलं आहे. आपल्या पहिल्या सामन्यात मालीला पॅराग्वेच्या संघाविरुद्ध २-३ अशी हार पत्करावी लागली होती. त्यामुळे स्पर्धेतलं आपलं आव्हान कायम राखण्यासाठी मालीच्या संघाला आजच्या सामन्यात विजय गरजेचा होता. त्यानुसार मागील विश्वचषक उप-विजेत्या माली संघाने तुर्कीचा ३-० असा धुव्वा उडवला.

सामन्याच्या पहिल्या सत्रात एक आणि दुसऱ्या सत्रात दोन गोल झळकावत मालीने तुर्कीच्या संघाला सामन्यात डोकं वर काढण्याची संधीच दिली नाही. मालीच्या खेळाडूंनी सामन्यात गोल करण्याच्या अनेक संधी वाया घालवल्या. या संधीचं गोलमध्ये रुपांतर झाल्यास मालीचा संघ आणखी मोठ्या फरकाने सामना जिंकू शकला असता. मिडफिल्डर डिजेमुसा ट्राओरेने ३८ व्या मिनीटाला गोल झळकावत मालीच्या संघाचं खातं उघडलं. यानंतर ६८ आणि ८६ व्या मिनीटाला गोल झळकावत मालीने आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

साखळी फेरीत मालीचा पुढचा सामना हा न्यूझीलंडविरुद्ध आहे. तर तुर्कीचा संघ हा पॅराग्वेशी दोन हात करेल. या सामन्यात काहीकाळासाठी पावसाने व्यत्यय आणला होता. मात्र मालीच्या विजयात पाऊस व्यत्यय आणू शकला नाही. त्यामुळे आगामी सामन्यात मालीचा संघ कशी कामगिरी करतोय याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

अवश्य वाचा – Live FIFA World Cup – अमेरिकेचा सलग दुसरा विजय, घानावर १-० ने मात