News Flash

फुटबॉलच्या पंढरीतील विश्वचषकाचा प्रो कबड्डीला ‘खो’

सॉल्ट लेक स्टेडियमच्या नूतनीकरणाची जोरदार तयारी सुरू आहे.

फुटबॉलच्या पंढरीतील विश्वचषकाचा प्रो कबड्डीला ‘खो’

घराघरांत फुटबॉलला धर्म समजल्या जाणाऱ्या या शहरात आगामी कनिष्ठ विश्वचषक स्पर्धेबाबत कमालीची उत्कंठा दिसून येत आहे. मात्र एके काळी कबड्डीत जबरदस्त आव्हान निर्माण करणाऱ्या या शहरात प्रो कबड्डी लीगबाबत फारशी उत्सुकता दिसून येत नाही.

विमानतळावरून शहरात प्रवेश करताना ‘फुटबॉलचा बादशहा’ समजल्या जाणाऱ्या दिएगो मॅराडोनाचे भव्य फलक पाहायला मिळतात. तिथेच येथील लोकांमध्ये फुटबॉलविषयी किती लोकप्रियता आहे याची प्रचीती येते. १७ वर्षांखालील गटाची विश्वचषक फुटबॉल स्पर्धा पुढील महिन्यात भारतात होत असून, या स्पर्धेचा अंतिम सामना येथील सॉल्ट लेक स्टेडियमवर होणार आहे. या सामन्याबाबत येथे खूपच औत्सुक्य आहे. या अंतिम सामन्यात भारताच्या प्रवेशाची शक्यता कमी आहे, याची पूर्ण कल्पना असूनही भारतीय कनिष्ठ संघातील तसेच बायच्युंग भूतियासह काही वरिष्ठ खेळाडूंचे फलक येथे अनेक ठिकाणी दिसतात. त्याचबरोबर या स्पर्धेचा सदिच्छादूत असलेल्या सचिन तेंडुलकरच्या छायाचित्रांसह या स्पर्धेचे भव्य फलक येथे दिसून येत आहेत. या स्पर्धेचा प्रसार करण्यासाठी माजी कर्णधार सौरव गांगुलीचेही ठिकठिकाणी फलक दिसून येतात.

सॉल्ट लेक स्टेडियमच्या नूतनीकरणाची जोरदार तयारी सुरू आहे. या स्टेडियम परिसराचे सुशोभीकरण सुरू असून स्टेडियमच्या कडेने असलेल्या भिंतीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

या पाश्र्वभूमीवर प्रो कबड्डीचे अस्तित्व नगण्यच आहे. एक-दोन ठिकाणीच बंगाल वॉरियर्स या स्थानिक संघाचे फलक दिसून आले. कोलकाता येथील सामने नेताजी सुभाष इनडोअर स्टेडियमवर आयोजित करण्यात आले आहेत. तेथेही अपेक्षेइतकी गर्दी दिसून आली नाही. त्यातच येथे सायंकाळी मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे अनेक ठिकाणी दीड ते दोन फूट उंच एवढे पाणी झाले आहे. त्याचाही परिणाम प्रेक्षकांच्या उपस्थितीवर दिसून आला. सामन्यांना जाण्यापेक्षा घरी वेळेवर जाण्याकडेच येथील लोकांचा कल दिसून येत आहे. शनिवार व रविवारी या सामन्यांना अधिक प्रतिसाद मिळेल अशी संयोजकांना अपेक्षा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 2, 2017 3:03 am

Web Title: fifa u 17 world cup calcutta football pro kabaddi
Next Stories
1 Pro Kabaddi Season 5 – पाटणाची हाराकिरी बंगालच्या पथ्यावर, घरच्या मैदानावर पहिला विजय
2 अंबाती रायडूकडून वृद्धास मारहाण, व्हिडिओ व्हायरल
3 शारापोव्हाचा संघर्ष
Just Now!
X