फिफा १७ वर्षाखालील मुलांच्या विश्वचषक स्पर्धेत फ्रान्सने पहिल्या मोठ्या विजयाची नोंद केली आहे. नवख्या न्यू कॅलेडोनियाच्या संघाचा ७-१ ने फडशा पाडून फ्रान्सने मोठ्या दिमाखात विश्वचषक स्पर्धेत आपला पहिला विजय मिळवला. न्यू कॅलेडोनियाचा संघ फ्रान्सच्या तुलनेत अगदीत दुबळा असल्याने हा सामना कमालीचा एकतर्फी झाला. गुवाहटीत खेळवल्या गेलेल्या या सामन्यात पहिल्या मिनीटापासून फ्रान्सच्या खेळाडूंनी सामन्यावर आपलं वर्चस्व ठेवलं होतं. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या ७ गोलपैकी ६ गोल हे फ्रान्सच्या खेळाडूंनी पहिल्या सत्रात झळकावले.

सामन्याच्या पाचव्या मिनीटाला बर्नाड ल्वाने Own Goal करत फ्रान्सच्या संघाला एक गोल बहाल केला. यानंतर फ्रान्सच्या खेळाडूंनी आयत्या मिळालेल्या गोलचा पुरेपूर स्वीकार करत कॅलेडोनियाला बॅकफूटवर ढकलण्यास सुरुवात केली. यानंतर अवघ्या काही क्षणात फ्रान्सच्या संघाने ३-० अशी आघाडी घेतली. हळूहळू आपली आघाडी वाढवत नेत फ्रान्सने पहिल्या सत्राच्या अखेरीस ६-० अशी आघाडी घेतली. यात भर म्हणून कॅलेडोनियाच्या संघाने आणखी एक Own Goal करत फ्रान्सच्या विजयात आपला हातभार लावला. पहिल्या सत्रातील फ्रान्सच्या ६ गोलपैकी २ गोल हे प्रतिस्पर्धी कॅलेडोनियाच्या खेळाडूंनी केले.

सामन्यातील दुसऱ्या सत्रात ९० व्या मिनीटाला कॅलेडोनियाच्या संघाने आपला पहिला गोल झळकावत फ्रान्सच्या विजयाचं अंतर कमी केलं. फ्रान्सला सामन्यात अखेरच्या सत्रात पेनल्टी कॉर्नर मिळाला होता, मात्र त्याचा फायदा उचलणं फ्रान्सच्या संघाला जमलं नाही. या पेनल्टी कॉर्नरचं रुपांतर गोलमध्ये झाल्यास फ्रान्सला आणखी मोठा विजय मिळवणं शक्य झालं असतं. ई गटात फ्रान्स आणि जपान हे संघ पुढच्या फेरीत पात्र ठरतील असा अंदाज वर्तवला जातोय. २००१ साली त्रिनिनाद आणि टोबॅगोत झालेल्या १७ वर्षाखालील मुलांच्या विश्वचषक स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं.