चौथ्या प्रयत्नांत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश; माजी विजेत्या मेक्सिकोवर मात

दोन जेतेपद नावावर असलेल्या मेक्सिकोचा कुमार विश्वचषक फुटबॉल स्पध्रेतील प्रवास उपउपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आला. इराणने २-१ अशा फरकाने विजय मिळवत पहिल्यांदा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. चौथ्या प्रयत्नांत इराणने पहिल्यांदाच उपउपांत्यपूर्व फेरीचा अडथळा पार केला. मोहम्मद

शरीफी व अल्लाहयार सय्यद यांनी पहिल्या ११ मिनिटांत प्रत्येकी एक गोल करून इराणचा विजय निश्चित केला होता. मेक्सिकोकडून रॉबेटरे डे ला रोसाने एकमेव गोल केला. उपांत्यपूर्व फेरीत इराणसमोर स्पेनचे आव्हान आहे.

गोव्यातील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर मंगळवारी झालेल्या या लढतीत २००५ आणि २०११मध्ये जेतेपद पटकावणाऱ्या मेक्सिकोचे पारडे जड मानले जात होते. मात्र, इराणने साखळी फेरीतील तिन्ही लढती जिंकून त्यांच्यासमोर कडवे आव्हान उभे केले. सामन्याच्या सहाव्या मिनिटाला अ‍ॅड्रीयन व्हॅझक्यूझने पेनल्टी क्षेत्रात चुकीच्या पद्धतीने इराणच्या खेळाडूना अडवले आणि पंचांनी त्वरित इराणला पेनल्टी स्पॉट किक बहाल केली. शरिफीने त्यावर कोणतीही चूक न करता सहज गोल करत इराणला १-० अशी आघाडी मिळवून दिली. हा जल्लोष विरण्यापूर्वीच इराणकडून सय्यदने अप्रतिम गोल केला आणि मेक्सिकोच्या गोटात तणावाचे वातावरण पसरले. गोलरक्षक अली घोलम झादेहने दिलेल्या दीर्घ पासवर सय्यदने केलेला गोल निर्णायक ठरला.

मेक्सिकोची बचाव दुबळा असल्याचे मत सामन्याच्या पूर्वसंध्येला इराणचे प्रशिक्षक अब्बास चमानियन यांनी व्यक्त केले होते आणि त्या रणनीतीनुसारच त्यांनी संपूर्ण सामन्यात खेळ केला. चेंडूवर अधिक काळ ताबा मिळवण्यात इराणच्या खेळाडूंना अपयश आले असले तरी काही मोजक्याच संधींवर त्यांनी मोहीम फत्ते केली. ३७व्या मिनिटाला रोसाच्या गोलने सामन्यात चुरस निर्माण होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, इराणच्या मजबूत बचावासमोर मेक्सिकोच्या खेळाडूंना यापेक्षा अधिक गोल करता आला नाही.

या विजयाचे श्रेय इराणचा गोलरक्षक अली घोलम झाडेह यालाही जाते. त्याने सुरुवातीपासूनच मेक्सिकोसमोर अभेद्य भिंत उभी करत प्रतिस्पर्धी संघाचे अनेक प्रयत्न हाणून पाडले. इराणला २००९ आणि २०१३ मध्ये उपउपांत्यपूर्व फेरीचा अडथळा पार करण्यात अपयश आले होते, परंतु यावेळी त्यांनी ही कसर भरून काढली.