FIFA U-17 विश्वचषकाचा मान यंदा भारताला मिळाला आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना कोलकात्याच्या ऐतिहासिक सॉल्टलेक स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या महत्वाच्या स्पर्धेला जास्तीत जास्त लोकांनी हजेरी लावावी याकरता पश्चिम बंगाल सरकार प्रयत्न करत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोलकात्यात होणाऱ्या १० सामन्यांसाठी ५ हजार विद्यार्थ्यांना मोफत पास देण्याचं ठरवलं आहे.

अवश्य वाचा – U-17 फुटबॉल विश्वचषकासाठी कोलकाता शहर सज्ज, सॉल्ट लेक स्टेडीयमचं रुपडं पालटलं

कोलकाता सरकारच्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी यासंदर्भात पीटीआयला माहिती दिली. ८ ऑक्टोबरला कोलकात्यात विश्वचषकाचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. त्यापूर्वी स्पर्धेतील आणखी नऊ सामनेही कोलकात्यातच खेळवले जाणार आहेत. त्यासाठी शहरातील विविध शाळा आणि महाविद्यालयातील ५ हजार मुलांना या सामन्यांचे मोफत पास दिले जातील. केवळ फुटबॉल खेळात स्वारस्य असलेल्या खेळाडूंनाच हे पास देण्यात येणार आहेत. कोलकाता शहरात फुटबॉलची प्रचंड क्रेझ आहे. या खेळाडुंना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने पश्चिम बंगाल सरकारने हा निर्णय घेतला आहे.

सॉल्टलेक स्टेडियममध्ये या विद्यार्थ्यांना बसण्यासाठी खास व्यवस्था करण्यात येणार आहे. यासाठी पश्चिम बंगाल क्रीडा प्राधिकरणाला फुटबॉल खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी करण्याचे आदेश दिले आहेत. याचसोबत या मुलांना ने-आण करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक विभाग ७० बस पुरवणार आहे. या मुलांच्या खाण्यापिण्याची व्यवस्थाही सरकारतर्फे करण्यात येणार आहे.

‘फिफा’तर्फे आयोजित करण्यात येणारी इतकी मोठी स्पर्धा कोलकाता शहरात होत आहे. कोलकाता आणि पश्चिम बंगालमध्ये अनेक खेळाडू फुटबॉलपटू होण्याचं स्वप्न बाळगून आहेत. या विद्यार्थ्यांना विश्वचषकाचे सामने थेट बघण्याची संधी मिळाली, तर भविष्यात ते देखील अशा स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करुन राज्याचं नाव मोठं करतील, असा आत्मविश्वास क्रीडा प्राधिकरणाने व्यक्त केला आहे.