‘विफा’च्या महत्त्वाकांक्षी उपक्रमात आत्तापर्यंत २५ अकादमींचा समावेश

‘‘पोर्तुगालमध्ये मुलांना वयाच्या सातव्या वर्षांपासून स्पर्धात्मक फुटबॉल खेळण्याची संधी मिळते. त्यामुळे कुमार (१७ वर्षांखालील) विश्वचषक फुटबॉल स्पध्रेत सहभागी होईपर्यंत त्यांच्यासोबतीला दहा वर्षांचा अनुभव असतो,’’ असे मत भारतीय संघाचे प्रशिक्षक लुईस नॉर्टन डी मॅटोस यांनी व्यक्त केले होते. केवळ पोर्तुगालच नव्हे, तर युरोप, आफ्रिका खंडातील प्रत्येक देशांमध्ये याच प्रकारे फुटबॉलपटू घडवण्याचे काम सुरू आहे. कुमार विश्वचषक स्पध्रेच्या निमित्ताने भारतातही अशी संस्कृती उदयास येत आहे. मिझोराममध्ये १२ वर्षांखालील मुलांची लीग खेळवली जाणार आहे, परंतु महाराष्ट्राने त्यातही आघाडी घेत ‘बेबी लीग’ खेळवण्याचा निर्धार केला आहे. या लीगमध्ये प्रत्येक अकादमीतील ४, ८ आणि १२ वर्षांखालील असे तीन संघ खेळवण्यात येणार आहेत.

कुमार विश्वचषक स्पध्रेमुळे देशात फुटबॉलसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण झाल्या आहेत. त्याचा सर्वाधिक फायदा मुंबईला झाला आहे. सध्या मुंबईत कुपरेज, अंधेरी क्रीडा संकुल, सेंट झेवियर्स (परळ), वांद्रे-कुर्ला संकुल येथे मुंबई जिल्हा फुटबॉल असोसिएशनची मैदाने आहेत. तसेच काही व्यावसायिक क्लबचीही स्वत:ची मैदान आहेत. विश्वचषक स्पध्रेमुळे नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाची मैदाने तयार करण्यात आली आहेत. एवढी मूलभूत सुविधा असलेली मैदान विश्वचषक स्पध्रेनंतरही उपयोगात असावी, यासाठी वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (विफा) खासगी अकादमीच्या संघांना सोबत घेऊन ‘बेबी लीग’ खेळवण्याचा विचार करत आहे.

महाराष्ट्रातील मुलांना वयाच्या चौथ्या वर्षांपासून फुटबॉलचे मार्गदर्शन मिळावे यासाठी ‘बेबी लीग’ खेळवण्यात येणार आहे. आत्तापर्यंत विफाशी संलग्न असलेल्या २५ अकादमींनी आपला सहभाग निश्चित केला आहे. या लीगमध्ये प्रत्येक अकादमींचे ४, ८ आणि १२ वर्षांखालील असे तीन संघ सहभाग घेणार आहेत. या तिन्ही संघांच्या कामगिरीवर अकादमीला गुण दिले जाणार असल्याने प्रत्येक वयोगटातील संघाची कामगिरी सहकारी संघासाठी महत्त्वपूर्ण असणार आहे. त्यामुळे प्रत्येक अकादमीतील संघांमध्ये स्पर्धात्मक वातावरण निर्माण होईल आणि त्यातून चांगले खेळाडू घडतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

‘‘परदेशात क्लबमधूनच राष्ट्रीय संघांना दर्जेदार खेळाडू मिळतात. आपल्याकडे याउलट आहे. पण कुमार विश्वचषक स्पध्रेतून बरेच काही शिकायला मिळाले. फुटबॉल प्रगतीच्या बाबतीत आपली वाटचाल कोणत्या दिशेने जायला हवी, याची माहिती मिळाली. त्यामुळेच ‘बेबी लीग’ खेळवण्याचा विचार सुरू आहे. विश्वचषक स्पध्रेनंतर या लीगला सुरुवात होईल. महाराष्ट्रातील या लीगमध्ये ४, ८ आणि १२ वर्षांखालील संघ खेळतील. त्यातून महाराष्ट्राच्या संघासाठी उदयोन्मुख खेळाडूंची निवड केली जाईल,’’ अशी माहिती ‘विफा’च्या सूत्रांनी दिली आहे.