18 January 2018

News Flash

फुटबॉल दिला; खेळायचे कुठे?

स्पर्धेच्या वातावरणनिर्मितीसाठी राज्य सरकारने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत.

पूनम धनावडे, नवी मुंबई | Updated: September 15, 2017 2:38 AM

नवी मुंबईतील ७० पैकी २३ शाळांत क्रीडांगणच नाही

सतरा वर्षांखालील विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या पाश्र्वभूमीवर राज्यातील सर्व शाळांत फुटबॉल स्पर्धा घेण्याची सूचना राज्य सरकारने केली असताना शाळेला मैदानच नाही, तर फुटबॉल कुठे खेळणार, असा प्रश्न नवी मुंबईतील अनेक शाळांना पडला आहे.

स्पर्धेच्या वातावरणनिर्मितीसाठी राज्य सरकारने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. १५ सप्टेंबरला होणारा फुटबॉल महोत्सव, हा त्याचाच एक भाग आहे. त्यासाठी शाळांना फुटबॉलचे वाटपही करण्यात आले आहे, मात्र नवी मुंबईतील ७० पैकी २३  शाळांना मैदानच नाही. त्यामुळे फुटबॉल स्पर्धा कुठे घ्यायची असा प्रश्न या शाळांना पडला आहे. इतर शाळांच्या मैदानांत स्पर्धा घेण्याची वेळ या शाळांवर आली आहे. शाळांना मैदानच नाही, फुटबॉल प्रशिक्षकही नाही. त्यामुळे फुटबॉल महोत्सव हे केवळ स्पर्धेपुरते, एक दिवसाचे साजरीकरण ठरणार आहे. नवी मुंबईतील रस्त्यांवरील खड्डय़ांपासून उड्डाणपुलांखालील अंधारलेल्या जागांपर्यंत जसे अनेक मुद्दे या स्पर्धेमुळे चर्चेत आले तसाच शाळांतील मैदानांच्या अभावाचा मुद्दाही या निमित्ताने ऐरणीवर आला आहे.

फुटबॉल स्पर्धेकरिता इतर शाळांच्या मैदानांचा किंवा सार्वजनिक मैदानांचा वापर केला जाणार असल्याची माहिती शिक्षण विभागकडून देण्यात आली. त्यामुळे एका दिवसापुरता मैदानाचा प्रश्न सोडवून शिक्षण विभागाने हात वर केले आहेत, मात्र या विद्यार्थ्यांच्या दैनंदिन व्यायाम आणि क्रीडाप्रकारांचा प्रश्न कायम आहे. पालिकेच्या वतीने शासन पातळीवर मैदानासाठी भूखंडाची मागणी करण्यात आली आहे, मात्र ती अद्याप प्रलंबित असल्याची माहिती, पालिकेने दिली.

विद्यार्थी क्रीडा सुविधांपासून वंचित

नवी मुंबई महापालिकेच्या एकूण ७० शाळा आहेत. ४२ इमारतींमध्ये या शाळा भरवल्या जातात. सरासरी पाहता प्रत्येक इमारतीत दोन तरी शाळा भरतात. या ७० शाळांपैकी केवळ ४७ शाळांना क्रीडांगण आहे. त्यात प्रत्येक इमारतीत दोन ते तीन शाळा असल्याने तेही अपुरे पडत आहे. ५३ प्राथमिक शाळांत ३१ हजार आणि १७ माध्यमिक शाळांत ६ हजार असे एकूण ३७ हजार विद्यार्थी शिकतात.

१५ सप्टेंबरला फुटबॉल महोत्सव होणार आहे. प्रत्येक शाळेत फुटबॉल स्पर्धा घेण्यात येणार आहेत. क्रीडांगण उपलब्ध नसलेल्या शाळांना इतर शाळा किंवा सार्वजनिक मैदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

संदीप सांगवे, शिक्षण अधिकारी, नवी मुंबई महानगरपालिका

शाळांना स्वत:चे मैदानच नसेल तर विद्यार्थ्यांनी फुटबॉल खेळू नये. शासनाकडून क्रीडांगणासाठी भूखंड देण्यात चालढकल केली जाते.  शासन विद्यार्थ्यांचे शारीरिक आरोग्य विचारात घेत नाही.

सुधाकर सोनवणे, महापौर, नवी मुंबई महानगरपालिका

First Published on September 15, 2017 2:38 am

Web Title: fifa u17 world cup football festivals football ground issue in navi mumbai
  1. A
    arun
    Sep 15, 2017 at 9:13 pm
    काय पोरकटपण आहे हे ! शाळांना मैदान नाहीत, मुलांना कधी हा खेळ खेळून माहीत नाही. भानामती अंगात आल्यासारखे उठले घुमायला लागले आणि फुटबॉल खेळायची घोषणा करून नवटंकी करायला लागले. सरकारचं काम आहे का हे ! सवंग आणि नवटांकीपणाचा हा कहर आहे. स्वतः:ची महत्वाची काम सोडून नसते उद्योग करणं हे maturity च लक्षण आहे का ?
    Reply